

Tembhurni Police Attacked
टेंभुर्णी : टेंभुर्णी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर तीन जणांनी दगड, काठी तसेच लाथा-बुक्क्यांनी हल्ला करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना आलेगाव बु. गावाजवळ गुरुवारी (दि.१) घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र अशोक शेटे (वय २९, नेमणूक – डायल ११२, टेंभुर्णी पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रविंद्र रामचंद्र चंदनकर, रामचंद्र तुकाराम चंदनकर (दोघे रा. आलेगाव बु., ता. माढा) आणि रामचंद्र तुकाराम चंदनकर यांचा जावई (नाव अज्ञात) यांचा समावेश आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, गुरुवारी महादेव तुपसौंदर (रा. आकुंबे, ता. माढा) यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती देत पोलिस मदतीची मागणी केली होती. त्यानुसार शासकीय कर्तव्य बजावत पो.कॉ. शेटे आलेगाव बु. येथे दाखल झाले. ते संवाद साधत असताना वरील तिघे तेथे आले आणि “तू इथे का आलास?” अशी विचारणा केली. शासकीय काम सुरू असल्याचे सांगताच आरोपी संतप्त झाले आणि त्यांनी मारहाण सुरू केली.
आरोपींनी शेटे यांना खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण केली. यावेळी एकाने दगड उचलून त्यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. शेटे यांनी तो वार चुकवला, मात्र दगड घसरून डोक्याच्या मागील बाजूस लागल्याने त्यांना दुखापत झाली. त्यानंतरही हल्ला सुरूच राहिला. शेटे हे पोलीस गणवेशात असल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्यांची सुटका केली. गर्दी वाढू लागल्याने तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
या घटनेप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तिन्ही आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके कार्यरत आहेत.
कर्तव्यावर असलेल्या पोलिसावरच हल्ला होत असल्याच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे दाद मागावी, असा सवाल उपस्थित होत आहे.