

Sugarcane Tractor Accident Traffic Jam
पोखरापूर : सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यातील कोळेगाव पाटी जवळ गुरुवारी (दि.१) सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान उसाचा ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे मोठी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. जवळपास एक तासापेक्षा जास्त वेळ सोलापूर व मोहोळ कडे जाणाऱ्या दोन्ही महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
एक जानेवारी रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या दरम्यान उसाने भरलेला ट्रॅक्टर कोळेगाव पाटीजवळ पलटी झाल्यामुळे वाहतूक थांबविण्यात आली होती तो ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला घेऊन वाहतूक सुरळीत करेपर्यंत दोन्ही बाजूला दोन ते अडीच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक वाहन चालकांनी लेन सोडून दुसऱ्या लेनमध्ये वाहने घातल्यामुळे दोन्ही बाजूला वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.सावळेश्वर टोल प्लाझा व महामार्ग पोलीस कोणत्याही प्रकारे वाहतूक सुरळीत करण्यासाठी तत्पर न दिसल्याने वाहनांमध्ये अडकलेल्या नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होत.
दिवसाकाठी लाखो रुपये चा टोल वसूल करणाऱ्या सावळेश्वर टोल प्लाझा चे अपघात दक्षता पथक केवळ नावालाच उरले असून अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी हे पथक तात्काळ उपायोजना करत नाही तर दुसरीकडे महामार्गावरील अपघातांसाठी विशेष नेमणुकीसाठी असलेले महामार्ग विभागाचे पोलीस कर्मचारी ही वाहन चालकांना शिस्त लावताना दिसत नाहीत. त्यामुळे एखादा अपघात झाल्यानंतर नागरिकांना तासनतास ताटकळत महामार्गावर प्रवास करण्याची वेळ आली आहे.