

मोहोळ : शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोहोळ पोलीस ठाण्यात मंगळवार (दि. २८ जुलै) रोजी रिक्षाचालक, हार-फूल विक्रेते, फेरीवाले व हातगाडी चालकांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेकायदेशीर स्टॉलधारकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला.
मोहोळ शहरात संपूर्ण तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा होत असते. विशेषतः पंढरपूर रोड, मेन रोड, सोलापूर रोड, कुरुल ब्रिज तसेच एसटी स्टँड शेजारील पुल परिसरात हातगाड्या, फेरीवाले आणि हार-फूल विक्रेते धोकादायक पद्धतीने स्टॉल उभारत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढत असून नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने संबंधित विक्रेत्यांना रस्त्याच्या कडेला अथवा वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी कोणतेही स्टॉल अथवा हातगाड्या लावू नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी सक्त सूचना दिली.
बैठकीत रिक्षाचालकांनाही वाहतूक शिस्तीबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. सर्व रिक्षाचालकांनी सात दिवसांच्या आत गणवेश परिधान करणे बंधनकारक असून, त्यानंतर विना गणवेश रिक्षा चालविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच प्रवाशांकडून ठरलेल्या दरापेक्षा जादा भाडे आकारू नये, रिक्षा शिस्तबद्ध पद्धतीने पार्क कराव्यात, वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊ नयेत, अशा सूचनाही देण्यात आल्या.
ही बैठक मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी वाहतूक शाखेचे सिद्धेश्वर बाबर, दराडे, संजय नेमाजी यांच्यासह मोहोळ शहरातील रिक्षाचालक, हार-फूल विक्रेते, फेरीवाले आणि हातगाडी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने शहरातील वाहतूक शिस्त अबाधित ठेवण्यासाठी सर्व संबंधितांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.