पोखरापूर (जि. सोलापूर) : सर्वसामान्य लोकांची कोणतीही मागणी नसताना सत्तेचा गैरवापर करून सगळे सरकारी कार्यालय अनगरला घेऊन जाण्याचा हा कुटील डाव आहे. त्याचाच एक भाग म्हणून अप्पर तहसील कार्यालय अनगर येथे नेले आहे. पेनुर व नरखेड येथील लोकांना येण्यासाठी हा अप्पर तहसील कार्यालयाचा घाट घातला आहे. तालुक्यातील स्वाभिमानी जनतेचा त्याला तीव्र विरोध आहे. सर्वपक्षीय जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. मोहोळ येथील सावली बंगला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उमेश पाटील बोलत होते.
ते म्हणाले, अनगर येथे मंजुरी मिळालेले अप्पर तहसील कार्यालय हे अचानक सर्वसामान्य जनतेवर आघात केल्यासारखे आहे. वास्तविक महसूल मंडळाची विभागणी लोकसंख्येच्या आधारावर होते. तशा प्रकारची मागणी ही निदर्शनास नाही. गेल्या १५ ते २० वर्षांपासून राज्यातील सुमारे ३० ते ४० अप्पर तहसील कार्यालयाची मागणी करणारी प्रकरणे सरकारकडे प्रलंबित आहे. मग, अशी कोणती आणीबाणी निर्माण झाली की, सर्व जुनी प्रकरणे प्रलंबित ठेऊन एकट्या अनगरचे अप्पर तहसील कार्यालयाचे प्रकरण मंजूर करण्यात आले.
ते पुढे म्हणाले, तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला असता दुय्यम निबंधक कार्यालय आणि अप्पर तहसील कार्यालय हे कुरूल किंवा कामती या भागात होणे अपेक्षित होते. परंतु जाणीवपूर्वक अहंकारातून अनगर येथेच अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्याचा हेतू आहे. मी सविस्तर मेसेज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविला आहे. पक्षाचा विचार न करता ते जर कार्यालय तिथे झाले तर आम्हाला सर्वसामान्य लोकांकडे तोंड दाखवायला जागा उरणार नाही. हा निर्णय आम्हाला अजिबात मान्य नाही, हे आमदारच मान्य नाहीत. आणि आमदारकीची उमेदवारी कशी जाहीर केली? यांना कोण अधिकार दिले?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कोर कमिटीची बैठक झालेली नाही. त्यामुळे पक्षाचे उमेदवारी जाहीर करण्याचा प्रश्नच येत नाही. आज अप्पर तहसील कार्यालय नेले आहे, उद्या पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, वन विभाग अशी सगळीच महत्त्वाची कार्यालय अनगरमध्ये नेऊन मोहोळची बाजारपेठ उद्ध्वस्त करून येथील व्यापाऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्ही तो कदापी खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा देत वेळ पडली तर आम्ही जनआंदोलन उभारू.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी गंभीर विचार करावा, अन्यथा येथील महायुतीचा उमेदवार एक लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभूत होईल, असे सांगत लोकशाहीची ताकद ओळखून मोहोळ तसेच पेनुर, शेटफळ व नरखेड या परिसरातील नागरिकांनी या जन आंदोलनात मोठ्या ताकतीने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
लोकांना किती काळ मूर्ख बनविता, जनतेच्या न्यायालयात हे चालणार नाही. बोगस प्रमाणपत्राचा उमेदवार चालणार नाही. यावेळी विधानसभेला आमदारच बदलून टाकू असे सांगत उमेश पाटील यांनी प्रस्थापितांच्या हातातून सत्ता उचकटून टाकण्याचेही आवाहन केले.