पोखरापूर (सोलापूर) : नव्यानेच मंजूर झालेल्या मोहोळ तालुक्यातील अनगर येथील अप्पर तहसील कार्यालयाला विरोध दर्शवण्यासाठी शनिवारी मोहोळकरांच्या वतीने मोहोळ शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार मोहोळ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
मोहोळ तालुक्याचे ठिकाण असून पेनुर शेटफळ व नरखेड परिसरातील नागरिकांना या ठिकाणी विविध कामांसाठी यावे लागते. मोहोळ शहरात तहसील कार्यालय हे सर्वांच्या सोयीचे असतानाही पेनुर शेटफळ व नरखेड मंडल मधील ४३ गावे अनगर येथे नव्याने झालेल्या अप्पर तहसिल कार्यालयाला जोडण्यात आली.
मोहोळ शहरातील व्यापारी बाजारपेठेवर याचा मोठा परिणाम होणार असल्याने समाज माध्यमांवर विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मोहोळ शहरातील व्यापाऱ्यांना शनिवारी मोहोळ बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार व्यापाऱ्यांनी उस्फूर्तपणे शहरातील मुख्य रस्त्यावरील बाजारपेठ तसेच कुरुल पंढरपूर व सोलापूर रस्त्यावरील व्यापारी गाळे बंद ठेवले. आजच मोहोळ शहरासह तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्यावतीने मोहोळ शहरातील शासकीय विश्रामगृहावर बैठकीच्या आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.