

अक्कलकोट : अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था व सकल मराठा समाजाच्या एका कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे डोक्यात शाई ओताण्यात आल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख आणि श्री स्वामी समर्थ यांचा अनादर केल्याच्या निषेधार्थ शिवधर्म फाउंडेशनच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शाई फासली. रविवारी अक्कलकोट येथे एका नागरी सत्कार आणि मानपत्र कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण गायकवाड आले होते त्यावेळी हा प्रकार घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा देखील राग पदाधिकाऱ्यांच्या मनात होता.
प्रवीण गायकवाड यांच्या निषेधार्थ शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. प्रवीण गायकवाड यांनी श्री स्वामी समर्थ आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य केले होते. संपूर्ण महाराष्ट्रात प्रवीण गायकवाड यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलने सुरू आहेत. प्रवीण गायकवाड हे रविवारी अक्कलकोट येथे आले होते. प्रवीण गायकवाड यांना हलगीच्या कडकडाटात स्वागत करून संयोजक कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जात असताना शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना वाटेतच अडवून त्यांच्या अंगावर काळी शाई ओतली. तसेच त्यांच्या तोंडाला सुद्धा काळे फासले. हा सर्व प्रकार होत असताना तेथे पोलीस किंवा अन्य कोणीही बंदोबस्तासाठी नव्हते
प्रवीण गायकवाड यांच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तर धर्मविर संभाजी महाराज आणि श्री स्वामी समर्थांचा जयजयकार करून पदाधिकारी आणि कार्यकर्ते निघून गेले. प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.संभाजी ब्रिगेडच्या नावामध्ये धर्मवीर शब्द वापरासाठी काही दिवसापूर्वीच शिवधर्म फाउंडेशनच्यावतीने सोलापुरात मोठा मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर रविवारी अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळी फासण्यात आले आहे.
दरम्यान यापूर्वी देखील गायकवाड व संभाजीब्रिगेडच्या विरोधात शिवधर्म संघटनेने उपोषण केले होते. आज त्यांच्या डोक्यावर शाई ओतली. शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केल्याची माहिती असून पोलिसांनी शाईफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. अशी माहिती समोर आली आहे.