

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'मराठा समाजाला मिळालेले ईएसबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा हे आरक्षण रद्द झालेले आहे. हायकोर्टामध्ये सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. आत्ताचे शिंदे-फडणवीस सरकार हे बहुजन मराठा समाजाविरोधातील आहे,' असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केला. गायकवाड म्हणाले, 'मराठा समाज हा दीर्घकाळापासून आरक्षणाची लढाई लढत आहे.
अगदी सुप्रीम कोर्टापर्यंतची लढाई समाजाने लढली आहे. आता समाजानेच आरक्षणाच्या मानसिकतेतून बाहेर पडायला हवे. आरक्षण म्हणजे सर्व काही नाही. उद्योग, व्यवसाय, व्यापार क्षेत्राकडे समाजाचे फार दुर्लक्ष झाले आहे. आपणही उद्योग, व्यवसाय, व्यापार करू शकतो, हा विश्वास समाजामध्ये निर्माण करायला हवा. त्यासाठीच 'अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला' हा नवा विचार आणि नवी दिशा घेऊन संभाजी ब्रिगेड समाजामध्ये जाणार आहे.
त्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन व मदत करायला उभी आहे.' छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ आणि बारामती येथे होणारी शिवसृष्टी आणि रायगड विकास प्राधिकरणाला दिलेल्या निधीवरील स्थगिती उठवावी, अन्यथा राज्यभर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गायकवाड यांनी या वेळी दिला.
राज्यपालांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुंबई वसवली आहे, मराठा समाजाने ती जपली आहे. त्यामुळे राज्यपालांनी प्रथम इतिहासाची पाने पलटवावीत आणि नंतरच वक्तव्य करावीत. राज्यपालांचा आम्ही जाहीर निषेध करतो. फडणवीस सरकारच्या कालावधीत अरबी समुद्रात शिवाजी महाराज स्मारक घोषित करण्यात आले. तेथे साधा पायाही उभारण्यात आलेला नाही, तरीही 268 कोटी रुपयांचा भ—ष्टाचार झाला आहे, हे आरटीआयमध्ये सिद्ध झाले आहे. समता, बंधुता, न्याय या विचाराने देश चालला पाहिजे. त्यासाठी हिंदुत्व नाही, तर भारतीयत्व जपले गेले पाहिजे, असा सल्लाही गायकवाड यांनी राज ठाकरेंना दिला.