पुणे: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जाणूनबुजून एकेरी उल्लेख करणार्या संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांचा जाहीर निषेध करत शिवधर्म फाउंडेशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराज असे पूर्ण लिहावे किंवा संघटनेचे नाव बदलावे, अशी मागणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी केली.
‘जय भवानी जय शिवाजी’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. फाउंडेशनचे राज्य उपाध्यक्ष किरण साळुंखे, पुणे जिल्हा अध्यक्ष करण ढाणे-पाटील, बारामती तालुका अध्यक्ष अक्षय चव्हाण, राहुल मदने, सुग्रीव निंबाळकर, विशाल धुमाळ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
काटे म्हणाले, संभाजी ब्रिगेड नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत आहे, ही बाब संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांना वारंवार निदर्शनास आणून दिली आहे. तरीही संभाजी ब्रिगेड संघटना व पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.
संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणार्याला फाशी देण्याची भाषा करतात. मात्र, स्वतःच्या संघटनेत संभाजी महाराजांचा अवमान होतोय, एकेरी उल्लेख होतोय, याकडे ते दुर्लक्ष करतात. हा त्यांचा दुटप्पीपणा आहे. संभाजी ब्रिगेड संघटनेने व पक्षाने नावात बदल केला नाही, तर संघटना आणि पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत.