मोहोळ शहर (सोलापूर) - मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील भीमनगर परिसरात पूर्वीच्या वादाचा राग मनात धरून मोठा जमाव घराकडे घेऊन येत घराची तोडफोड करून मारहाण केल्याची गंभीर घटना घडली. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात ३७ नामनिर्देशित आरोपींसह सुमारे १०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत फिर्यादीसह परिसरातील काही नागरिक जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याबाबत अरविंद सिद्धेश्वर थोरात (वय ४३, रा. शेटफळ, ता. मोहोळ) यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीनुसार, २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास अरविंद थोरात हे पत्नी निता व मुलगा अमित यांच्यासह भीमनगर येथील घरी असताना परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. यावेळी गावातील मोठा जमाव त्यांच्या घराच्या दिशेने येत असल्याने पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने पोलिसांनाही धक्काबुक्की करून बाजूला सारत घराकडे धाव घेतल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
जमावाने घराच्या दरवाजाची मोडतोड करून घरात प्रवेश केला व थोरात कुटुंबीयांना मारहाण करून घराबाहेर काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी सुरेश उर्फ बबलू प्रकाश गुंड याने जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप आहे.
दरम्यान, संजय उर्फ किंचू अशोक भांगे याने हातातील लोखंडी पाईपने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात प्रहार केल्याचा आरोप अरविंद थोरात यांनी केला आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. तसेच डाव्या खांद्यावर, उजव्या हातावर आणि डाव्या पायावर मारहाणीत जखमा झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याच घटनेत भीमनगरमधील सुधीर सुखदेव रावडे, रितेश सुधीर रावडे, वीर सचिन रावडे, मयुरी सुधीर रावडे, नयन सुधीर रावडे, प्राची सुधीर रावडे, कविता महादेव ओव्हाळ आणि आनंद महादेव ओहोळ यांनाही हातातील लोखंडी पाईप व लाकडी दांडक्यांनी मारहाण करून जखमी केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांच्या घरांचीही तोडफोड व नासधूस करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी अमित दत्तात्रय वागज, संजय उर्फ किंचू अशोक भांगे, सोन्या उर्फ विजय अशोक भांगे, मनोज बंडू वागज, अमर पमू कुंभार यांच्यासह एकूण ३७ जणांची नावे फिर्यादीत नमूद करण्यात आली आहेत. त्यांच्यासह इतर सुमारे १०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सोलापूर उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत. शेटफळ येथे पोलीस बंदोबस्त प्रमाणात असून परिस्थिती नियंत्रणात आहे.