सोलापूर : विवाहितेने जीवन संपवले, घरासमोरच केले अंत्यसंस्कार, पतीसह सासू, सासऱ्या विरोधात गुन्हा

विवाहितेचा मृत्‍यू
विवाहितेचा मृत्‍यू

टेंभुर्णी ; पुढारी वृत्‍तसेवा माहेरवरून टीव्ही, चार चाकी वाहन घेण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये म्हणून सासरच्या लोकांनी मानसिक छळ केल्यामुळे माढा तालुक्यातील निमगाव (टें) येथील (२४ वर्षीय) विवाहित तरुणीने विष प्राशन केले होते. तीच्यावर उपचार चालू होते. दरम्‍यान दि.२६ जून रोजी अकलूज येथे या विवाहितेचा उपचारादरम्‍यान मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली असून, हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मृत विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलिसांनी पती, सासरा व सासू यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी पती व सासुस अटक केली आहे.

टेंभुर्णी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मृत प्राजक्ता हिचे लग्न दि.१५ एप्रिल २०२० रोजी निमगाव (टें) येथील रोशनकुमार चट्टे यांच्याबरोबर झाले होते. लग्न झाल्यानंतर तीन महिन्यापासून पती रोशनकुमार नारायण चट्टे, सासरे नारायण भगवान चट्टे व सासू कौशल्या नारायण चट्टे हे तिघे प्राजक्तास माहेरवरून लग्नात लहान टीव्ही दिला. आता मोठा टीव्ही घेऊन ये व चार चाकी गाडी घेण्यासाठी एक लाख रुपये आण म्हणून जाचहाट करून मानसिक छळ करत होते. मागील तीन वर्षापासून हा छळ चालू होता. यातच प्राजक्ता हिचे नऊ महिन्यांपूर्वी वडील वारले होते. यामुळे प्राजक्ताच्या आईने आता आमची परिस्थिती नाही. तुम्ही संभाळून घ्या असे सांगितले होते.

दि.१७ जून २०२३ रोजी प्राजक्ताचे सासरे नारायण चट्टे यांनी प्राजक्ताचा हात धरून वाईट बोलून व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. ही घटना तिने आईस सांगितली होती. यावरून झालेल्या भांडणात प्राजक्ताने दि.१८ जून रोजी सकाळी घरातच विष प्राशन केले. प्रथम टेंभुर्णीत व नंतर अकलूज येथे प्राजक्तावर उपचार चालू होते. उपचार चालू असतानाच दि.२६ जून रोजी प्राजक्ताचा मृत्यू झाला.

यानंतर प्राजक्ताची आई श्रीमती सविता दत्तात्रेय लोंढे रा. पिंपळनेर ता.माढा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलिसांनी प्राजक्ताचा पती रोशनकुमार नारायण चट्टे, सासरे नारायण भगवान चट्टे व सासू कौशल्या नारायण चट्टे रा.निमगाव (टें)ता.माढा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पती रोशनकुमार चट्टे व सासू कौशल्या चट्टे या दोघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीष जोग हे करीत आहेत.

प्राजक्ताचा मृत्यू झाल्यानंतर माहेर कडील नातेवाईक प्रक्षुब्ध झाले. त्यांनी प्राजक्ताचा मृतदेह टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आणला. तसेच प्राजक्ता हिचा सर्वांनी छळ करून त्रास दिला. तसेच तिचे पती, सासरे यांनीच तिला औषध पाजले आहे, असा आरोप करून त्यांना तातडीने अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.

पोलिसांनी समजूत काढल्यानंतर या नातेवाईकांनी प्राजक्ता हिचा मृतदेह सासरी घेऊन जात तिच्यावर राहत्या घरासमोरच अत्यंसंस्कार केले. प्राजक्ताचा दीड वर्षाचा मुलगा आईच्या प्रेमास पोरका झाला. त्‍यामुळे परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news