

दीपक शेळके
सोलापूर : महापालिकेच्या विवाह नोंदणीसाठी असलेले अधिकृत संकेतस्थळ गेल्या महिनाभरापासून बंद असून यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे. आरोग्य विभागाकडून वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित तांत्रिक विभागाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या विवाह नोंदणीचे प्रमाण वाढले आहे. शासकीय कामासाठी अणि इतर कामासाठी आधार कार्डप्रमाणे विवाह नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक केल्याने विवाह नोंदणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी राज्यशासनाच्या वतीने राज्यातील सर्व महानगरपालिकेसाठी अधिकृत संकेतस्थळ तयार केले आहे. मात्र गेले एक महिना झाले सोलापूर महानगरपालिकेतील विवाह नोंदणी वेबसाईट 3 नोव्हेंबरपासून बंद आहे. संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे विवाह नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार विवाह नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.