

सोलापूर : सोलापुरातील होटगी रोडवरील विमानतळावरून सोलापूर ते मुंबई, सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू करण्यात आली असून, या विमानेसेवेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. परंतु होटगी रोडवरील विमानतळ परिसरात मांस दुकानांमुळे पक्ष्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे विविध पक्ष्यांचा अडथळा निर्माण झाल्याने विमानतळ परिसरातील मांस दुकानांवर शासनाकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. दर पंधरा दिवसांनी या परिसरातील मांस विक्री दुकानांची तपासणी करून आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
विमानतळ परिसरात मांस विक्रीमुळे मांस तुकडे खाण्यासाठी पक्षी आकाशात घिरटे घालत आहेत. त्यामुळे विमानतळ परिसरात प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा असल्याने नियमांची कडक अमंलबजावणी केली जात असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
सोलापूर विमानतळ परिसरांतील दहा मांस विक्री करणार्या दुकानांची नोंदणी शासनाकडे करण्यात आली आहे. या दुकानांची दर पंधरा दिवसांनी तपासणी करण्यात येत आहे. दुकानाच्या पसिरात कुठेही उघड्यावर मांस पडणार नाही, त्यामुळे पक्षी किंवा भटकी कुत्रे यांची संख्या वाढणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.
सोलापूर विमानतळाच्या लगतच असलेली अतिक्रमण काढण्यात येत आहे. याशिवाय या ठिकाणी असलेल्या मोकाट कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्यात येत आहे. सुरक्षा कर्मचारी यांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे.
विमानतळ परिसरात विमानसेवेसाठी आवश्यक असलेली सर्व सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. विमानतळाच्या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव 10 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, आणखी 15 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना विमानतळ प्राधिकारणाला दिल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.