

Karmala Wall Collapse Elderly Couple Death
करमाळा : करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील केतूर क्रमांक १ परिसरात रविवारी (दि. ३१ मे) रात्री झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळून वृद्ध दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वादळामुळे शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उजनी लाभक्षेत्रातील पोमलवाडी येथील जगन्नाथ मारुती नवले (वय ८०) व त्यांच्या पत्नी शालन जगन्नाथ नवले (वय ७५) हे दाम्पत्य उजनी जलाशयाजवळील आपल्या शेतवस्तीवर वास्तव्यास होते. रविवारी रात्री सुमारे नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान अचानक जोरदार वादळी वाऱ्यास सुरुवात झाली. यावेळी सिमेंटच्या विटा एकावर एक रचून उभारलेली भिंत कोसळून ती थेट दाम्पत्याच्या अंगावर पडली. या दुर्घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळाच्या आजूबाजूला कोणतीही वस्ती नसल्याने ही दुर्घटना रात्री उशिरापर्यंत कोणाच्याही निदर्शनास आली नाही. दरम्यान, करमाळा येथे असलेल्या त्यांच्या नातवाने रात्री संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आजोबांनी फोन न उचलल्याने त्याला संशय आला. सोमवारी सकाळी तो वस्तीवर पोहोचला असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नवले दाम्पत्याचा झालेला मृत्यू गावकऱ्यांच्या मनाला चटका लावणारा ठरला असून केतूरसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, उजनी लाभक्षेत्रातील पोमलवाडी, हिंगणी, गुलमोहरवाडी, केतूर, वाशिंबे आदी भागांतही वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेकडो एकरांवरील केळी पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच गावरान आंब्यांची झाडेही वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहेत.
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकरी व मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.