

सोलापूर : सुमीत वाघमोडे
मद्यनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मळीच्या (मोलॅसिस) उत्पादनात राज्यात सर्वाधिक वाटा असणाऱ्या सोलापुरात 'ड्राय डे' ची संख्याही सर्वाधिक असल्याची आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीय व राज्यस्तरीय 'ड्राय डे' व्यतिरिक्त जिल्हा प्रशासनाकडूनही विविध कारणांसाठी मोठ्या संख्येने 'ड्राय डे' जाहीर केले जात आहेत. सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका तसेच विविध महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीमुळे सोलापूरातील 'ड्राय डे'ची संख्या वाढत आहे.
राज्यात सुमारे ५२ लाख मेट्रिक टन मळीचे उत्पादन होत असून, त्यात सोलापुरात दरवर्षी आठ ते दहा लाख मेट्रीक टन मळीचे उत्पादन होते. ही मळी डिस्टिलरी आणि मद्यनिर्मिती उद्योगासाठी महत्त्वाचा कच्चा माल ठरते. मात्र, मळीचे उत्पादन आणि मद्यनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंद ठेवण्याचे दिवसही मोठ्या प्रमाणावर आहेत.
वर्षभरात सोलापुरात सरासरी ३० ड्राय डे असतात. शासनाने निश्चित केलेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय 'ड्राय डे' व्यतिरिक्त्त स्थानिक परिस्थितीचा विचार करून धिकारी कार्यालयाकडून काही दिवस जिल्हाधिकारी 'ड्राय डे' चे आदेश दिले जातात.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, धार्मिक सण, विविध मिरवणुका तसेच महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हे निर्बंध लागू केले जातात. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात 'ड्राय डे'चे प्रमाण वाढताना दिसत आहे.
सोलापुरातील वर्षभरातील 'ड्राय डे' असे
२६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन
१९ फेब्रुवारी - छत्रपती शिवाजी महाराज जयंती
१४ एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
१ मे - महाराष्ट्र दिन
१५ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन
२ ऑक्टोबर - महात्मा गांधी जयंती
६ डिसेंबर - महापरिनिर्वाण दिन
याशिवाय संक्रांत, ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रा, धुलिवंदन, रंगपंचमी, आषाढी-कार्तिकी एकादशी, गणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी, दसरा, रमजान ईद, बकरी ईद याचबरोबर इतर काही मिरवणुकांदिवशीही 'ड्राय डे' घोषित केला जातो.