Sangli District Bank Election : खानापूर-आटपाडीत आघाडीचा शिवसेनेला 'बाय'

भाजपविरोधातच लढत शक्य; जिल्हा परिषद निवडणुकीप्रमाणे समीकरणे ?
Sangli District Bank Election
Sangli District Bankpudhari photo
Published on: 
Updated on: 

सांगली : शशिकांत शिंदे

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाच्या छाननीची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता जिल्ह्यातील राजकीय वातावरणात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. छाननीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वैध उमेदवारांच्या यादीवरून राजकीय रणनीतीचे वेध लागले असून, खानापूर आणि आटपाडी तालुका सोसायटी गटात महाविकास आघाडीने शिवसेना एकनाथ शिंदे गटाला एकप्रकारे 'बाय' दिल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे.

जिल्हा बँक निवडणुकीसाठी सोसायटी गटात प्रत्येक तालुक्यातील एक उमेदवार आहे. आटपाडी आणि खानापूर तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्राबल्य आहे. या गटातून विद्यमान खानापूर तालुक्यात विद्यमान संचालक अमोल बाबर, तर आटपाडी तालुक्यात विद्यमान संचालक तानाजी पाटील हे पुन्हा मैदानात उतरले आहेत. या गटातून खानापूर आणि आटपाडी तालुक्यामध्ये महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने फारसे प्रमुख उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत.

तानाजी पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील, आबासाहेब नरसिंगराव देशमुख आणि हणमंतराव धोंडीसाहेब देशमुख यांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर खानापूर तालुक्यातून अमोल बाबर, यांच्याशिवाय माधव ऊर्फ रवींद्र जगन्नाथ देशमुख, संदीप बाबासाहेब मुळीक आणि वैभव सदाशिवराव पाटील यांचे अर्ज वैध ठरले आहेत. खानापूर आणि आटपाडीत शिंदे गटाची ताकद पाहता, महाविकास आघाडीने येथे मवाळ भूमिका घेतल्याने या ठिकाणी शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार का, याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. बाबर गट विरुद्ध पाटील गट असे समीकरण खानापूर तालुक्यात अनेक वर्षांपासून कायम आहे.

Sangli District Bank Election
Mangalsutra Theft : मंगळसूत्र चाेरले, पोलिस समोर येताच चक्क गिळले, विट्यातील थरारक प्रकार

दरम्यान, सांगली जिल्हा परिषदेत ज्या पद्धतीने महाविकास आघाडी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट एकत्र आले होते, तशीच पुनरावृत्ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे खासदार संजय पाटील यांचा गट वगळता इतर राजकीय गटांनी यापूर्वी महाविकास आघाडीला साथ दिली होती. आता संजय पाटील यांनी स्वतंत्र आघाडी तयार करून ते मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडीतील किंवा वरिष्ठ पातळीवर दबाव आणून शिवसेनेतील कोणी आपल्या गळाला लागेल का, याच्या प्रयत्नात भाजपचे नेते आहेत.

याच समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांची नुकतीच पुण्यात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत जागावाटपावर सविस्तर चर्चा झाली. दुसऱ्या बाजूला भाजपच्या नेत्यांनीही या निवडणुकीसाठी जोरदार ताकद लावली आहे. इच्छुकांनी मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

Sangli District Bank Election
Mumbai Rainfall: १० वर्षांत दुसऱ्यांदा सप्टेंबरमध्ये कमी पाऊस; २०१८ मध्ये सर्वांत कमी पाऊस

जिल्हा बँक निवडणुकीत अत्यंत मर्यादित मतदार असल्याने ही निवडणूक पक्षीय राजकारणापेक्षा नेत्यांचे वैयक्तिक संबंध, संपर्क आणि वर्चस्व यावरच अधिक अवलंबून असते. अनेक उमेदवारांनी गेल्या काही महिन्यांपासूनच मतदारांची नाकेबंदी करून त्यांना आपल्या बाजूने पक्के बांधून ठेवले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास अजून कालावधी शिल्लक असल्याने २१ ऑक्टोबरनंतरच निवडणुकीचे खरे आणि अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

महिला, राखीव गटात महाविकास आघाडीला फायदा?

जिल्हा बँक निवडणुकीसाठी सेवा सोसायटी गटातील मतदारांना सोसायटी गटाशिवाय महिला राखीव, अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय गटातील उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार असतो. जिल्ह्यातील सेवा सोसायटी गटात महाविकास आघाडीचे स्पष्ट प्राबल्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे या प्राबल्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होऊन, महिला व इतर राखीव गटामधून त्यांचे अधिक उमेदवार निवडून येण्याची मजबूत शक्यता वर्तवली जात आहे.

होनमोरे यांचा दोन्ही गटाशी सलोखा

राजकीय वर्तुळात बाळासाहेब होनमोरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांचे महाविकास आघाडीतील नेते आमदार जयंत पाटील आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील या दोन्ही विरोधी गटातील प्रमुख नेत्यांशी अत्यंत जवळचे व चांगले संबंध आहेत.

नुकताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून गेल्या आहेत. जिल्हा बँकेची निवडणूक प्रत्यक्ष लागली तरी अथवा बिनविरोध पार पडली तरीही, बाळासाहेब होनमोरे यांना या निवडणुकीत राजकीयदृष्ट्या फायदाच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जत सोसायटी गटातील निवडणूक पडळकरांच्या अर्जावर अवलंबून

जत सोसायटी गटातील निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत. या गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी पडळकर यांच्या अर्जावर हरकत घेतली आहे. सुनावणीनंतर पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यास जत तालुक्यातील ही लढत कमालीची रंगतदार आणि चुरशीची होणार आहे.

मतदारांना सहलीवर पाठवण्याची तयारी !

जिल्हा बँक निवडणुकीत अत्यंत मर्यादित आणि ठराविक मतदार असल्याने ही निवडणूक निव्वळ पक्षीय राजकारणावर न होता वैयक्तिक संबंध व संपर्कावरच सर्वाधिक अवलंबून असते. हे ओळखूनच सर्वच इच्छुक उमेदवारांनी मतदारांवर आतापासूनच बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. मतदारांशी संपर्क वाढवण्यासोबतच इतर गटांनी गळ घालू नये म्हणून काही प्रमुख उमेदवारांनी मतदारांना बाहेर सहलीवर पाठवण्याचीही तयारी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news