सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा या दोन तालुक्यांमध्ये पाऊस पडला नव्हता. मात्र, मागील तीन-चार दिवसांपासून या दोन्ही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या पावसाने झालेल्या नुकसानीसाठी सरसकट मदत देण्याची मागणी शेतकर्यांमधून केली जात आहे.
उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी या चार तालुक्यांमध्ये यापूर्वी जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे या चार तालुक्यातील शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रशासनाने सरकारकडे केली आहे. मात्र, मागील तीन-चार दिवसांपसून ज्या तालुक्यांमध्ये पाऊस नव्हता, त्याठिकाणीही जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई देताना सरसकट देण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकर्यांमधून केली जात आहे.
अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यांमध्ये झालेल्या पावसाने पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. दररोजच पावसाने हजेरी लावल्यामुळे पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. उडीद, तूर, मूग, सुर्यफूल, मका या पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. याशिवाय काढणीला आलेल्या पपई, डाळिंब या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी कांदा पिकाची लागवड झाली आहे. मात्र, अतिवृष्टीने कांद्याचेही १०० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देताना तालुक्याचा निकष न ठेवता जिल्ह्यातील सर्वच शेतकर्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी मंडलात ७३ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. त्या मंडलात अतिवृष्टी झाली आहे. सांगोला तालुक्यातील जवळा व संगेवाडी या मंडलांमध्ये ५० मिलीमिटर पाऊस झाल्यामुळे तेथील शेतकर्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. त्या परिसरातील पिकांचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हेही वाचलंत का ?