Anurag Thakur : ज्ञानव्यापी मशीद निर्णयाचे स्वागत; अनुराग ठाकूर | पुढारी

Anurag Thakur : ज्ञानव्यापी मशीद निर्णयाचे स्वागत; अनुराग ठाकूर

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : ज्ञानव्यापी मशिदीच्या मुद्यावरून कोर्टाने जो निर्णय घेतला आहे, तो स्वागतार्ह आहे. मात्र, या निर्णयानंतर सगळ्यांनी शांत राहावे आणि न्यायालयाला त्यांचे काम करू द्यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण येथे केले.

कल्याण ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या अनुराग ठाकूर यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज व्यापारी, कर्मचारी, डॉक्टर, अशा समाजातील विविध घटकांना भेटून त्यांच्या काही समस्या जाणून घेतल्या आहेत, असे ठाकूर यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या कल्याण योजना, अन्न योजना या सगळ्या योजनांचा लाभ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तर काही महिलांनी मुद्रा योजनेचा महिलांना लाभ मिळावा, अशी मागणी केली. जीएसटी आणि एमसीए च्या पोर्टलवर बदल करा, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. यासंदर्भात वरिष्ठांशी आणि अधिकाऱ्यांशी बोलून काही बदल करता येतो का ते पाहू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. दरम्यान, कल्याण ग्रामीण लोकसभेतील दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी विविध व्यक्तींची भेट घेऊन ते चर्चा करताना दिसत आहेत.

अनुराग ठाकूर यांचे आयुक्तांना खडेबोल

कल्याण डोंबिवली शहर हे स्मार्ट सिटी आहे हे ऐकूनच मी हैराण झालो. ज्या शहराला स्मार्ट सिटी म्हणून घोषित केले आहे त्या ठिकाणी बदल आणि काम झालेले मी पाहिले आहे. मात्र कल्याण डोंबिवली हे शहर स्मार्ट सिटी म्हणून घोषित केल्याचे मला वाटलेच नाही, असे खडेबोल कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे याना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सुनावले.

लक्ष 24 कल्याण ग्रामीण या उपक्रमांतर्गत कल्याण ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचा तीन दिवसीय अभ्यास दौरा करण्यासाठी अनुराग ठाकूर कल्याण डोंबिवली शहरात आले आहेत. आज दुसऱ्या दिवशी सायंकाळी त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेचे कल्याण येथील मुख्यालयात महापालिका आयुक्त, अधिकारी आणि कर्मचारी यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान ते स्मार्ट सिटीच्या कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांना स्मार्ट सिटी संदर्भातील काही व्हीडीओ दाखवण्यात आले. हे व्हिडीओ पाहता क्षणीच त्यांनी ही स्मार्ट सिटी आहे हे ऐकूनच मी हडबडलो असे सांगत ज्या शहरात स्मार्ट सिटीची घोषणा केली आहे तेथे स्वच्छता, वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबवल्याने शहरे सुंदर झालेली मी पहिली आहेत. मात्र कल्याण डोंबिवली शहरात दोन दिवसांच्या दौऱ्यात हा बदल मला कुठेही दिसला नाही असे सांगताना त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांना खडेबोल सुनावले.

हेही वाचा

Back to top button