सोलापूर : जिल्ह्यात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता

कोकणात ‘ऑरेंज अलर्ट’
कोकणात ‘ऑरेंज अलर्ट’

पापरी; पुढारी वृत्तसेवा : पुढील तीन दिवस (१७ मार्च ते १८ मार्च) सोलापूर जिल्ह्यत ढगाळ वातावरण राहणार आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, वाऱ्याचा वेग हा ताशी ४० ते ५० किमी असणार आहे, असाही अंदाज हवामान विभागाने व्‍यक्‍त केला आहे.

जिल्ह्यात पुढील तीन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील. तसेच पावसासोबत वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता देखील आहे. यामुळे परिपक्व अवस्थेतील ज्वारी,गहू , हरभरा, मका इत्यादींची रब्बी पिकांवर आणि त्यांच्या काढणी व मळणीवर याचा परिणाम होणार आहे. दरम्यान काढणी केलेल्या पीकाची मळणी करणे शक्य नसल्यास पिक सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून ताडपत्रीचा साहाय्याने झाकून ठेवावे. पक्व भाजीपाला व फळपिकाची काढणी लवकर करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र आणि मोहोळचे कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ सूरज मिसाळ यांनी केले आहे.

डॉ सूरज मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळी पावसामुळे केळी बागेवर देखील परिणाम होऊ शकतो. केळी बागेतील ज्या झाडावरील घड वजनाने अधिक आहेत, अशी झाडे पडु शकतात. त्यामुळे केळी बागेतील झाडे पडू नयेत म्हणून व वजनाने मोठ्या असलेल्या घडास गरजेप्रमाणे बांबूचे किंवा पॉलीप्रोपेलीनच्या पट्यांच्या सहयाने झाडांना / घडांना आधार/ टेकू द्यावा. परिपक्व झालेली टरबूज आणि खरबुजाची फळे तोडून घेवून सावलीत ठेवावी. त्यातली किडग्रस्त सड़की फळे वेगळी काढून चांगली फळे बाजारपेठेत नेण्याची व्यवस्था करावी. परिपक्व झालेले कांदा पीक काढून घ्यावे आणि ते सुरक्षित ठिकाणी ठेवावे, अशा सूचना कृषी विभागाकडून जारी करण्यात आल्या आहेत.

स्थानिक वातावरणाचा अंदाज घेऊन शेतकरी बांधवानी शेतातील माल सुरक्षित ठिकाणी ताडपत्रीच्या साहाय्याने झाकून ठेवावा. हंगामी पिके, फळबागा, भाजीपाला पिकामध्ये अंतरमशागतीची कामे, निंदण (खुरपणी) तसेच कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनाची फवारणी व उभ्या पिकांना खते देण्याची कामे पावसाच्या उघडीपनंतर करावीत, असे देखील सांगण्यात आले आहे.

मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट पाऊस होण्याची शक्यता असल्याने, शेतात काम करता मेघगर्जनेचा आवाज आल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने जनावरांना गोठ्यामध्येच चाऱ्याची व्यवस्था करावी. जनावरांना मोकळ्या चराई क्षेत्रावर चारणे टाळावे. शेतकरी बंधूनी हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानाच्या पूर्वानुमानाकरिता मेघदूत मोबाईल ऍपचा वापर करावा. शेतकरी बंधूंनी मेघगर्जना व विजेचा पूर्वानुमानाकरिता दामिनी ऍपचाही वापर करावा, असे आवाहनही डॉ. सूरज मिसाळ यांनी केले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news