

सोलापूर ः बाळे येथे एसटी तिकिटाचे पॉईंट नसल्याने प्रवाशांना शहरातील मुख्य बसस्थानकात यावे लागत असे. बाळेत वाहक पॉईंटची सुरूवात केल्यामुळे प्रवाशांचे वेळ व पैसेही वाचणार असून यांना बसस्थानकात येण्याची गरज पडणार नसल्याचे मत परिवहन महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी व्यक्त केले.
बाळे चौकात परिवहन महामंडळाच्या सुरू केलेल्या वाहक पॉईंटचे उद्घाटन करताना विभागीय व्यवस्थापक गोंजारी बोलत हेोते. यावेळी आगार प्रमुख उत्तम जोंधळे, आगार व्यवस्थापक नागेश जाधव, स्थानक प्रमुख मल्लिकार्जून अंजुटगी, सहायक वाहतूक अधीक्षिका उमा गव्हाणे, वाहतूक निरीक्षक बाळासाहेब वाघमारे, विभागीय वाहतूक अधिकारी परशुराम नकाते, विभागीय अभियंता चौधरी, यंत्र चालन अधिकारी शीतल बिराजदार यांच्यासह परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विभागीय व्यवस्थापक गोंजारी म्हणाले, बाळेचा परिसर शहराचा वाढीव वसाहत आहे. शिवाय, या परिसरात लहान, मोठे उद्योग आहेत. सामान्य कुटूंबातील प्रवाशीच महामंडळाचे प्रवासी आहेत. याच, प्रवाशांची विचार करूनच येथे दोन पाळीत वाहकांची नियुक्ती केली आहे. लांब व नियमितपणे धावणाऱ्या बसेसचेही तिकीट येथील वाहकांकडून मिळणार आहे.