सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यामध्ये असलेल्या वनक्षेत्रासह मोकळ्या जागेवरील वृक्षांची कत्तल करून त्याची तस्करी करण्यात येत आहे. यासाठी आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची शंका उपस्थित होत आहे. असे असताना वन विभाग मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. याबाबत दैनिक 'पुढारी'ने वृत्तमालिका प्रकाशित करताच अक्कलकोटचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांनी वृक्ष तस्करावर कारवाई करून मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कामगिरी रविवारी सकाळी करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र फारच कमी आहे. शासकीय नियमाप्रमाणे जिल्ह्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक असताना जिल्ह्यात मात्र ०.३३ टक्के वनक्षेत्र आहे. वनक्षेत्र वाढवण्यासाठी शतकोटी वृक्ष लागवड योजनेसह अनेक योजनांचा पाऊस पडला तो केवळ कागदावरच. वनविभागाची कार्यवाही आणि अंमलबजावणी करण्यासाठी धडपड केल्याचे फक्त कागदोपत्री दिसले. वृक्ष क्षेत्र वाढीमध्ये कुठेच दिसले नाही.
मोठ्या प्रमाणात असलेल्या वनक्षेत्रावर कुर्हाडीचे घाव घातले जात असताना कारवाई न करता बघ्याची भूमिका घेत तस्कारानाच पाठबळ देण्याचे काम वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी करत असल्याचे एकंदरीत सर्वच बाबीवरून समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर दैनिक 'पुढारी'ने 'झाडांची कत्तल', 'सोलापुरी कोळशाचा कर्नाटक, आंध्र, गुजरातमध्ये धूर' आणि 'दुसऱ्यांना जीवदान देणाऱ्या झाडांचे अस्तित्वच धोक्यात' अशा तीन भागांमध्ये वृत्तमालिका प्रकाशित करून वास्तव मांडण्यात आला. यानंतर वनविभाग खडबडून जागे होऊन कारवाई करेल अशी अपेक्षा वन्यप्रेमीमधून व्यक्त केली जात होती. मात्र झोपेचे सोंग घेतलेले वन विभागाने पुन्हा गाढ झोपेत निद्रित होण्याची भूमिका घेतली. यामुळे वृक्ष तस्कर या सगळ्या प्रकारची संधी साधत वृक्षांवर पुन्हा कुर्हाडीचे घाव घालत सुटले.
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास उडगी (ता. अक्कलकोट) परिसरातून अवैधपणे वृक्षतोड करून गाड्या भरून जातानाचे दृश्य स्थानिक ग्रामस्थांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपले गेले. ही बाब वनविभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. 'पण लक्षात कोण घेतो', याप्रमाणे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर शनिवार आणि रविवार दिवसभर अक्कलकोट- सोलापूर महामार्गाच्या बाजूला असलेली मोठ-मोठी चिंचेची झाडे तोडली जाऊ लागली. महामार्गाच्या जवळच झाडांची कत्तल सुरू असतानाची बाब वन कर्मचाऱ्यांना कळविण्यात आली. तरीही त्यांनी काहीच हालचाली केल्या नाहीत. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांनी स्वतः घटनास्थळी दाखल होत वृक्ष तोडणाऱ्या तस्करांच्या टोळीला ताब्यात घेतले आणि कारवाई केली.
अक्कलकोट-सोलापूर रस्त्यावर असलेल्या कर्जाळच्या माळरानावर वनक्षेत्र आहे. तेथील झाडे नष्ट झाली आहेत. दोन वर्षापूर्वी या माळरानावर पुन्हा नव्याने झाडे लावण्यात आली. पण तीही झाडे जगली नाहीत. सर्वात कहर म्हणजे या क्षेत्राला वारंवार आग लागण्याच्या घटना घडतात. रस्त्याच्या कडेलाच हे वनक्षेत्र असतानासुद्धा वन कर्मचारी काहीच भूमिका घेत नाहीत. यामुळे त्यांच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे. असाच प्रकार गळोरगी, उडगी, सलगर, वळसंग, चुंगी येथील वनक्षेत्राच्या बाबतीत सुरू आहे.
ही केवळ अक्कलकोट तालुक्यातील स्थिती नाही. पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा, बार्शी, दक्षिण, उत्तर सोलापूर, सांगोला, मंगळवेढा येथेही असे वृक्ष तस्कर कार्यरत आहेत. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती भागामध्ये असलेल्या भागात ही टोळी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. या भागात कत्तल करुन तस्करी करणे सोयीचे होत आहे.