

Mohol Bople Somling Temple Theft
मोहोळ : मोहोळ तालुक्यातील बोपले येथील सोमलिंग मंदिरातून देवाच्या चांदीच्या पादुका चोरीला गेल्याची घटना शनिवारी (दि. १० ) उघडकीस आली. अंदाजे ५० हजार रुपये किमतीच्या आणि सुमारे २०० ग्रॅम वजनाच्या या पादुका अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत नरहरी पुजारी हे बोपले येथे कुटुंबासह राहतात. ते गावच्या शिवारातील सोमलिंग देवस्थान पब्लिक ट्रस्टच्या मंदिरात पुजारी म्हणून सेवा करतात. शुक्रवारी (दि. ९ ऑक्टोबर) त्यांनी नेहमीप्रमाणे पहाटे साडेपाच वाजता मंदिरात पूजा-अर्चा आणि धार्मिक विधी पूर्ण केले. त्यानंतर ते दैनंदिन कामात व्यस्त झाले.
शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पुजारी मंदिराच्या आवारातील साफसफाई करून गाभाऱ्यात गेले. त्यावेळी सिमेंटमध्ये बसवलेल्या देवाच्या चांदीच्या पादुका जागेवर दिसून आल्या नाहीत. त्यांनी गाभाऱ्यासह मंदिराच्या परिसरात शोध घेतला; मात्र पादुका कुठेही आढळल्या नाहीत.
पादुका गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या चोरीला गेल्याची खात्री झाली. या पादुका सुमारे २०० ग्रॅम वजनाच्या आणि ५० हजार रुपये किमतीच्या असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर मंदिराचे पुजारी हनुमंत पुजारी यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
या घटनेमुळे परिसरातील भाविकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मंदिरातील पादुका चोरणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.