

मोहोळ : मोहोळ शहर व परिसरात दुचाकींना मोठ्या आवाजाचे सायलेंसर बसवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात मोहोळ पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहनांमध्ये कंपनीने बसवून दिलेल्या सायलेंसरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ तसेच गर्दीच्या ठिकाणी काही तरुणांकडून मोठ्या आवाजात दुचाकी चालविण्याचे प्रकार वाढले आहेत. सायलेंसरमध्ये बदल करून वाहनांचा आवाज वाढविणे, अचानक वेगाने वाहन चालविणे तसेच नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांमुळे ध्वनिप्रदूषणासह अपघाताचा धोका निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलिसांनी अशा वाहनांची तपासणी सुरू केली असून, नियमबाह्य सायलेंसर आढळल्यास संबंधित वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वाहनांमध्ये अनधिकृत बदल करून पुन्हा रस्त्यावर आढळणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.विशेषतः तरुणांनी वाहनांमध्ये फॅन्सी किंवा मोठ्या आवाजाचे सायलेंसर बसविणे टाळावे. पालकांनीही आपल्या मुलांकडील दुचाकींची तपासणी करून वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेता, नियमभंग करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. त्यामुळे वाहनचालकांनी स्वतःहून नियमांचे पालन करावे, दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे . असे पोलिस निरीक्षक दिपक पाटील यांनी सांगितले