Seraik Criminals Action | सराईत 13 गुन्हेगारांविरूध्द मोकाअंतर्गत कारवाई
सोलापूर : अकलुज येथील लक्ष्मण बंदपट्टे व ज्ञानेश्वर काळे या सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरुध्द गंभीर स्वरूपाचे विविध गुन्हे आहेत. त्यामुळे या टोळीतील 13 गुन्हेगारांविरोधात मोक्का कायद्याअंतर्गत पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
अकलूज व परिसरात या गुन्हेगाराची टोळी सक्रीय असून त्यांनी माळशिरस तालुक्यात संघटीतरित्या गुन्हे करून समाजामध्ये दहशत पसरवलेली होती. या टोळीतील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांनी मागील 10 वर्षामध्ये सातत्याने टोळी सदस्यांनी घातक शस्त्रांचा वापर करून खुनाचा प्रयत्न करणे, घातक हत्याराचा वापर करून जबर इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, मालमत्ता जबरीने घेण्याच्या उद्देशाने इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, घातक हत्याराने सज्ज होवून गैरकायदेशीर मंडळी जमवून दंगा करणे, शिविगाळ, दमदाटी करून ठार मारण्याची धमकी देणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत पसरवलेली होती.
गुन्हेगार टोळीतील सदस्या विरूध्द यापूर्वी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 प्रमाणे हद्दपारी सारखी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तरी देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती.
दि. 14 जून रोजी या टोळीने संयुक्तरित्या एकत्र येवून खुनाचा प्रयत्न करण्याचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला होता. त्यावरून अकलुज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. आरोपी हे संघटीतरित्या एकत्र येवून टोळीचे वर्चस्व राहावे व त्यातून टोळीस फायदा होण्याच्या उद्देशाने वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत आहेत. यामुळे सदर गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 या कलमाचा अंतर्भाव होणेबाबतचा प्रस्ताव अकलूज पोलिस ठाण्याकडून सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाची पडताळणी व अवलोकन करून महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 या कलम 23 (1) (अ) प्रमाणे मोक्का कायदयान्वये कलमांचा अतंर्भाव होण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकारी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांना असल्याने अतुल कुलकर्णी यांनी शिफारशीसह प्रस्ताव सादर केला होता. त्यास सुनिल फुलारे यांनी आरोपीना मोक्का कलम लावण्याबाबतची मंजुरी दिली आहे. तसेच या गुन्हयाचा पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी अकलुज विभाग संतोष वाळके करीत आहेत.
मोक्का लावण्यात आलेल्या आरोपींची नावे
लक्ष्मण बाबाजी बंदपटटे, शंकर अशोक काळे, नेश्वर उर्फ माऊली अशोक काळे, राजु ज्ञानेश्वर काळे, अर्जुन दत्ता चौगुले, अतुल दत्तात्रय काळे, आकाश रमेश धोत्रे, बाळु भारत मदने, रोहीत मारूती काळे, सलीम अब्दुल तांबोळी, मनोज अशोक काळे, किशोर राजेंद्र नवगन, सर्व रा. इंदिरा नगर, घरकुल, अकलुज, तर बाजीराव हणंमत सरगर रा. खुडुस.
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूराचे सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, एस. डी.पी.ओ. अकलुज संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा, पो. नि. निरज उबाळे अकलुज पोलीस ठाणे यांच्यासह अकलूज पोलीस ठाणेकडील, सपोनि योगेश लंगोटे, पोउपनि सुधीर खारगे, पोह अमोल बकाल, समीर पठाण, रियाज तांबोळी, हरीष भोसले यांनी केली.

