

कुर्डूवाडी : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दोघा भावांच्या घरात दिवसाढवळ्या चोरी झाली असून दोघांचे मिळून सुमारे 10 तोळे सोने व 50 ग्रॅमहून अधिक चांदी चोरीला गेली. शहराच्या गजबजलेल्या चौकात दिवसा चोरी झाल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
ही घटना दि.20 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 ते सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. याबाबत विरेंद्र भांबुरे व रवींद्र भांबुरे यांनी कुर्डूवाडी पोलिसांत चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी विरेंद्र व रवींद्र हे दोघे भाऊ एकमेकांच्या पाठभिंतीला राहात असून रवींद्र हे त्यांच्या मुलाच्या ऑपरेशनकरिता चार दिवसांपूर्वी पुण्याला कुटुंबासमवेत गेले होते. तर विरेंद्र हे नेहमीप्रमाणे त्यांच्या टेलरिंगच्या दुकानी गेले. त्यांची पत्नी कामानिमित्त दुपारी 12 वाजता कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. दुपारी 3.30 वाजता विरेंद्र घरी जेवण करुन पुन्हा घराला कुलूप लावून दुकानात गेले. सायंकाळी सहाच्या सुमारास ते चहा पिण्यासाठी घरी आले. त्यावेळी त्यांना घरातील लाकडी कपाटाच्या लॉकरमधील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी कपाटातील साडेतीन तोळ्यांचे गंठण व 50 ग्रॅम चांदीचा कंबरपट्टा दिसून आला नाही. चोरट्यांनी घराच्या टेरेसवरील जिन्यातील घरात प्रवेश केल्याचे लक्षात आले.
त्यांनी बंधू रवींद्र यांच्या घरात जाऊन पाहिले असता, त्यांच्या घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून कपाटातील सुमारे साडेसहा तोळ्यांचे गंठण, नेकलेस, अंगठ्या व कानातील सोन्याचा ऐवज तसेच चांदीचे चार ब्रेसलेट, दोन पैंजण जोड व गणपतीचा हार व रोख पंचवीस हजार रुपये असा ऐवज लंपास झाल्याचे दिसले. सीसीटीव्ही फुटेज व तज्ज्ञांनी मिळवलेल्या ठस्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.