

सोलापूर : डीजेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याच्या कारणावरून नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 22 सप्टेंबर ते दि. 7 ऑक्टोबर या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात बंदी घातली आहे. यापूर्वीच पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी सोलापूर पोलिस आयुक्तालय हद्दीत डीजे बंदीचे आदेश काढले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव पाठोपाठ नवरात्र उत्सवातही डीजेवर बंदी कायम राहिली आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाकडून मिरवणुका काढल्या जातात. तसेच गरबा, दांडीया आयोजक-संयोजक मंडळाकडून आयोजित कार्यक्रमांमध्ये डीजे सिस्टीम व लेझर लाईटचा शोचा वापर केला जातो. याचा नागरिकांना त्रास होतो. त्याअनुषंगाने बंदी कायम करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणार्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई होईल, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आदेशात नमूद केले आहे.