Ashadhi Wari | 'भानुदास एकनाथ'च्या जयघोषाने दुमदुमला भीमातीर : कौठाळी येथे एकनाथ महाराजांच्या पादुकांना विधिवत भीमा स्नान

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी पैठणहून येणाऱ्या संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे तसेच साडे येथून येणाऱ्या संत बलभीम बाबा पालखी सोहळ्याचे कौठाळी येथे उत्साहात स्वागत
Sant Eknath Maharaj Palkhi Kauthali
"भानुदास एकनाथ"च्या अखंड जयघोषाने भीमातीराचा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला Pudhari
Published on
Updated on

Sant Eknath Maharaj Palkhi Kauthali

सोमा लोहार

कौठाळी : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी पैठणहून येणाऱ्या संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे तसेच साडे येथून येणाऱ्या संत बलभीम बाबा पालखी सोहळ्याचे कौठाळी येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. "भानुदास एकनाथ"च्या अखंड जयघोषाने भीमातीराचा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांप्रमाणेच पैठणहून निघणारा संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळाही मानाच्या पालख्यांपैकी एक मानला जातो. साडेतीनशे वर्षांहून अधिक परंपरा लाभलेल्या या पालखी सोहळ्यात यंदा सुमारे ३० हजारांहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत. रथासमोर पाच दिंड्या तर रथामागे राज्यातील विविध ३० जिल्ह्यांतील वारकरी पायी वारी करत आहेत.

Sant Eknath Maharaj Palkhi Kauthali
Ashadhi Wari: राष्ट्रीय आयुष वारी विठ्ठल रुख्माईच्या दारी

संत बलभीम बाबा पालखी सोहळ्यालाही अनेक वर्षांची परंपरा असून या सोहळ्यात पाच हजारांहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत.

होळे येथील मुक्कामानंतर संत एकनाथ महाराजांची पालखी भीमा नदीवरील नाथसेतूजवळ दाखल झाली. यावेळी संतांच्या पादुकांची विधिवत पूजा करून भीमा नदीत पवित्र स्नान घालण्यात आले. त्यानंतर चंद्रभागेच्या तीरावर आरती करून पालखीने पुढील प्रवासास प्रस्थान केले.

यंदा होळे ग्रामस्थांच्या वतीने भीमा नदीकाठी नव्याने उभारण्यात आलेल्या पालखी चौथऱ्यावर पालखी विसावली. चौथऱ्यापासून नदीपात्रापर्यंत फुलांच्या पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या. नदीत पादुकांच्या स्नानासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. परंपरागत होडीचालक चंद्रकांत नगरे यांच्या होडीतून मानाचे वारकरी, झेंडेकरी, टाळकरी व मृदंगवादक यांनी भीमा नदीत प्रदक्षिणा घातली. त्यानंतर नदीकिनारी संतांच्या पादुकांना विधिवत भीमा स्नान घालण्यात आले.

Sant Eknath Maharaj Palkhi Kauthali
Ashadhi Wari : नाथांच्या पादुकांचा आज होळे येथे भीमा स्नान सोहळा

कौठाळी ग्रामपंचायतीच्या वतीने नाथसेतूवर आकर्षक रांगोळी व फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच जेसीबीच्या सहाय्याने संत एकनाथ महाराजांच्या पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजीसह करण्यात आलेल्या जंगी स्वागतामुळे पालखी सोहळ्यातील वारकरी भारावून गेले.

यावेळी सोहळा प्रमुख तथा नाथवंशज रघुनाथ महाराज गोसावी, झानेश महाराज गोसावी, योगेश महाराज गोसावी, गंगाराम राऊत, बबन महाराज बोरकर, ऋषी नवले, उगले महाराज, प्रसाद गुरु, रवि कुलकर्णी, चंद्रकांत अंबिलवादे, गव्हाणे महाराज, कौठाळीचे माजी सरपंच महादेव गाढवे, उपसरपंच धोंडीराम वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाटील, शिवसेना सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सागर गोडसे, सोमनाथ नागटिळक, मोहन नागटिळक, अरुण नागटिळक, रामदास नागटिळक, सचिन आटकळे, ग्रामसेवक कृष्णदेव नवले, होळेचे माजी सरपंच सुहास गुराडे, गोरख पाटील यांच्यासह दोन्ही गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर संत एकनाथ महाराजांची पालखी महादेव मंदिरात, तर संत बलभीम बाबांची पालखी हनुमान मंदिरात विसावली. आरोग्य विभागाच्या वतीने दोन्ही पालखी सोहळ्यांतील वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा व औषधोपचार देण्यात आले. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसाद व अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली.

Sant Eknath Maharaj Palkhi Kauthali
Ashadhi Wari | 'चरणसेवा' उपक्रमातून ४.९६ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्यसेवेचा लाभ

भीमा स्नानासाठी कायमस्वरूपी घाट उभारावा

"संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा हा आषाढी वारीतील मानाचा तिसरा पालखी सोहळा असूनही शासनाकडून अपेक्षित सुविधा मिळत नाहीत. पालखी मार्गावरील काही रस्ते अरुंद असल्याने रथ नेण्यात अडचणी येतात. भीमा स्नानासाठी नदीकाठी कायमस्वरूपी घाट उभारणे आवश्यक आहे. तसेच पालखी सोहळ्याच्या प्रारंभापासून आरोग्य सुविधा, पोलीस बंदोबस्त व इतर सोयी उपलब्ध करून द्याव्यात," अशी मागणी पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ बुवा गोसावी यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news