Ashadhi Wari | 'चरणसेवा' उपक्रमातून ४.९६ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्यसेवेचा लाभ

राज्यातील १४ जिल्ह्यांतील तब्बल ४ लाख ९६ हजारांहून अधिक वारकऱ्यांना लाभ
Ashadhi Wari Warkari Seva
Ashadhi Wari Warkari SevaPudhari
Published on
Updated on

Ashadhi Wari Warkari Seva

वाशिम : आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या 'चरणसेवा' उपक्रमाचा समारोप शुक्रवार (दि. २४ जुलै) रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा यंदा राज्यातील १४ जिल्ह्यांतील तब्बल ४ लाख ९६ हजारांहून अधिक वारकऱ्यांना लाभ झाला.

आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना होणारा शारीरिक ताण, स्नायूदुखी, पायांना येणारे फोड, थकवा तसेच पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा वाढता धोका लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. मागील वर्षी सात जिल्ह्यांमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाचा यंदा विस्तार करून तो १४ जिल्ह्यांपर्यंत नेण्यात आला.

Ashadhi Wari Warkari Seva
Ashadhi Wari 2026: भक्ती अन् असीम श्रद्धा...; व्हीलचेअरवरून दिंडीत सहभाग घेत शियेच्या विठ्ठल भक्ताचा प्रेरणादायी प्रवास!

१४ जिल्ह्यांतील १४० सेवा केंद्रांतून सुविधा

सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, सांगली, अमरावती आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांतील १४० मुक्कामस्थळांवर सेवा केंद्रे उभारण्यात आली होती. या केंद्रांवर चरणसेवा, मोफत आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी, प्रथमोपचार, आवश्यक औषधांचे वितरण, रुग्णवाहिका सेवा तसेच गरजेनुसार पुढील उपचारांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.

१६४ आरोग्य संस्थांचा सहभाग

या उपक्रमात राज्यभरातील १६४ आरोग्य संस्थांनी सहभाग नोंदविला. ७ हजार ५३८ स्वयंसेवकांसह ११ हजार ३३१ डॉक्टर, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवाकार्यात योगदान दिले. चरणसेवेसाठी ३ हजार लिटर आयुर्वेदिक औषधी तेलाचा वापर करण्यात आला, तर स्वयंसेवकांसाठी १० हजार टी-शर्ट उपलब्ध करून देण्यात आले. तसेच आठ जनजागृती रथांच्या माध्यमातून विविध आरोग्यविषयक संदेश वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले.

Ashadhi Wari Warkari Seva
Ashadhi wari 2026 Anwa jalana: मराठवाड्याची पंढरी अर्थात श्रीक्षेत्र आन्वा...; आषाढी वारीची अखंड भक्तिपरंपरा

आरोग्य जनजागृतीवरही भर

उपचारांबरोबरच आरोग्य जनजागृतीलाही या उपक्रमात विशेष महत्त्व देण्यात आले. स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, संसर्गजन्य आजारांपासून बचाव, रक्तदान, अवयवदान, निरोगी जीवनशैली तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती जनजागृती रथांद्वारे वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली.

लोकसहभागामुळे उपक्रम यशस्वी

राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये 'चरणसेवा' उपक्रम प्रभावीपणे राबवून सुमारे ४ लाख ९६ हजार वारकऱ्यांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यात यश आल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला विविध आरोग्य संस्था, दानशूर व्यक्ती, डॉक्टर, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी, आरोग्य कर्मचारी आणि हजारो स्वयंसेवकांनी दिलेल्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया आयोजकांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news