

कासेगाव : श्री संत गजानन महाराजांची पालखी शुक्रवारी (दि .१७)सायंकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे मुक्कामी दाखल झाल्यानंतर काही वेळातच संततधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे पालखी मुक्कामासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेतील काही बाबी समोर आल्या. दरम्यान, अनेक तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने वारकरी व भाविकांची मोठी गैरसोय झाली, तर अंधारामुळे मुक्कामस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या वॉटरप्रूफ मंडपात अनेक ठिकाणी गळत असल्याने पाणी साचले. परिणामी, अनेक वारकऱ्यांना रात्रभर जागा बदलत मुक्काम करावा लागला. मंडपाची क्षमता अधिक असतानाही सुमारे १५० वारकऱ्यांनाच तेथे मुक्काम करता आला. उर्वरित वारकऱ्यांना प्राथमिक शाळा तसेच ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिलेल्या ठिकाणी आश्रय घ्यावा लागला.
पालखीसारख्या राज्यस्तरीय धार्मिक सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असताना,मुक्कामस्थळी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे व्यवस्थेच्या गुणवत्तेबाबत वारकरी व ग्रामस्थांतून प्रश्न उपस्थित करण्यात आले. विशेषतः वॉटरप्रूफ म्हणून उभारण्यात आलेल्या मंडपात गळती होणे आणि अनेक तास वीजपुरवठा खंडित राहणे यामुळे भविष्यात अशा सोहळ्यांसाठी अधिक सक्षम, दर्जेदार आणि पावसाळी परिस्थितीचा विचार करून नियोजन करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने पालखी मुक्काम हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळे अशा मुक्कामस्थळी निवारा, अखंड वीजपुरवठा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांचे नियोजन अधिक परिणामकारक व दर्जेदार असावे, अशी अपेक्षा वारकरी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली. उळे येथील मुक्कामादरम्यान निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा मोठ्या धार्मिक सोहळ्यांसाठी प्रशासनाने मुक्काम व्यवस्था अधिक सक्षम व दर्जेदार करावी, तसेच महावितरणने अखंड वीजपुरवठ्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक व पर्यायी उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशी अपेक्षा वारकरी व ग्रामस्थांनी व्यक्त केली.