

दीपक देशमुख
यवत: जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रविवारी (दि. १२) सायं. भक्ति-मय वातावरणात यवत येथे मुक्कामी दाखल झाला. "ज्ञानोबा-तुकोबा"च्या अखंड जयघोषाने, टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण यवत नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी यवतकरांनी उत्स्फूर्त तयारी केली होती.
शनिवारी लोणी काळभोर येथील मुक्काम पूर्ण करून रविवारी सकाळी पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी यवतच्या दिशेने मार्गस्थ झाला. उरुळी कांचन येथे एकादशीचा उपवास सोडल्यानंतर पालखीने पुढील प्रवास सुरू केला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास पालखी सोहळा हवेली तालुक्यातून दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे दाखल झाला. तेथे दौंड तालुक्यातील भाविकांनी फुलांची उधळण करत आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात तुकोबारायांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
बोरीभडक येथून पालखी सोहळा मजल-दरमजल करत सहजपूर, कासुर्डी आणि खामगावमार्गे यवतच्या हद्दीत दाखल झाला. गावाच्या सीमेवर हजारो ग्रामस्थ, महिला, युवक आणि वारकरी पालखीच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि विठ्ठलनामाच्या गजरात तुकोबारायांच्या पालखीचे भावपूर्ण स्वागत करण्यात आले.
यवत ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच समीर दोरगे, सुरेश शेळके, नानासाहेब दोरगे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश कुदळे, सदानंद दोरगे, कुंडलिक खुटवड यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालखीचे स्वागत केले. रात्री सुमारे साडेआठ वाजता पालखी सोहळा श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात मुक्कामी दाखल झाला. मंदिरात पालखीचे विधिवत स्वागत झाल्यानंतर समाजआरती पार पडली. त्यानंतर दिंड्यांची हजेरी घेण्यात आली. हजेरी पूर्ण झाल्यानंतर वीणेकरी, चोपदार आणि हजारो वारकरी आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी विसावले.
पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी यवत ग्रामपंचायत, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी व्यापक नियोजन केले होते. वारकऱ्यांच्या निवासासाठी चार ठिकाणी जर्मन तंबू उभारण्यात आले होते. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा आणि इतर आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या. सोमवारी (दि. १३) सकाळी वारकऱ्यांच्या स्नानासाठी बाजार मैदान आणि जिल्हा परिषद शाळा परिसरात विशेष पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली होती.
यवत गावातील परंपरेनुसार संपूर्ण गाव पालखीच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. वारकरी आणि भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पालखीतळालगत मदत व स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. प्रशासन, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांनी वारकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली.
यंदा राज्य शासनाच्या वतीने पालखी मार्गावर उभारण्यात आलेल्या आकर्षक स्वागत कमानींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खुटबाव येथील भैरवनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पालखी मार्गावर साकारलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी वारकरी आणि भाविकांची मने जिंकली. दरम्यान, पालखी सोहळा दौंड तालुक्यात दाखल झाल्यानंतर आमदार राहुल कुल यांनी काही काळ तुकोबारायांच्या पालखी रथाचे सारथ्य करून वारी परंपरेप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.
प्रशासनाचे सुयोग्य नियोजन
पालखी सोहळा शांततापूर्ण आणि सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन केले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव धडस, पोलिस निरीक्षक संतोष तासगवकर, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, प्रांताधिकारी रेवणनाथ लबडे, तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी अरुण मलभर तसेच विविध शासकीय विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करत वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे यवत येथील पालखी मुक्काम शिस्तबद्ध, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.