

Pune Solapur Highway Speeding Car Hits Bike
मोडनिंब : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेटफळ गावाजवळ भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला, तर कारमधील तीन जण किरकोळ जखमी झाले. सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे पुणे–सोलापूर महामार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
हा अपघात सोमवारी (दि. ५) सकाळी सुमारे १० वाजता सोलापूर–पुणे महामार्गावरील शेटफळ येथील उड्डाण पुलाच्या सुरू असलेल्या कामाजवळ घडला. मुंबईहून सोलापूरकडे जाणारी भरधाव कार (क्रमांक MH 46 BU 5408) ने मोडनिंब येथून सिद्धेवादीकडे जाणाऱ्या दुचाकीला (क्रमांक MH 13 V 6039) पाठीमागून धडक दिली.
या धडकेत दुचाकीचालकाच्या डोक्याला गंभीर मार लागला. जखमी अवस्थेत त्यांना वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेतून डॉ. गोरखनाथ लोंढे यांनी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. कारमधील तीन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून शेटफळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील गस्तीपथक तसेच मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार व दुचाकी रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव युवराज बजरंग शिंदे (वय ५५), रा. सिद्धेवादी, ता. मोहोळ, जि. सोलापूर असे आहे. घटनेची माहिती मोहोळ पोलिस ठाण्याच्या अपघात विभागाचे अधिकारी पवार यांना देण्यात आली असल्याची माहिती वरवडे टोल नाका येथील गस्तीपथक प्रमुख संतोष खडके यांनी दिली.