

पंढरपूर : प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल असलेल्या एका महिलेचा आवश्यक चाचणी न करता रक्त चढवल्यामुळे मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांच्या व रक्त संकलन केंद्र चालकाच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. (Crime News)
आरती सुरज चव्हाण (वय २२) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. आरती चव्हाण ही गर्भवती महिला प्रसुतीसाठी पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. उपचारादरम्यान डॉक्टरांनी कुटुंबीयांना तिच्यासाठी रक्त आणण्यास सांगितले. त्यानंतर तिला रक्त चढवण्यात आलं. मात्र, रक्त चढवल्यानंतर तिची प्रकृती अधिकच बिघडली. तीन दिवस तिच्यावर उपचार सुरू होते, अखेर तिचा सोलापूर येथील रूग्णालयात मृत्यू झाला. या घटनेनंतर पंढरपुरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि रक्त संकलन केंद्रातील टेक्निशियनचे लेखी जबाब घेतले आहेत. रूग्णाला रक्त पुरवठा करणाऱ्या संबंधित रक्त संकलन केंद्राचे कामकाज त्वरीत थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.