पंढरपूर : विठ्ठल मंदिर संवर्धनाचे काम पूर्णत्वाकडे
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला सातशे वर्षांपूर्वीचे पुरातन मूळ रूप देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मंदिराचे जतन व सुशोभीकरणाचे काम दोन टप्प्यात सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील या कामात मंदिरातील अनेक पुरातन दगडी शिळा, खांबावरील शिलालेख, रेखाटणे, कलाकृती द़ृष्टीस पडत आहेत, तर खांबावर कोरण्यात आलेल्या कलाकृती स्पष्ट दिसू लागल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या गाभार्यातील कामे प्रथम प्राधान्याने पूर्ण करुन भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे मंदिराचा पुरातन दगडी गाभारा द़ृष्टिपथास येतो. जो दर्शनासाठी आलेल्या भाविकांना भावतो आहे. 73 कोटी 84 लाखांच्या या विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. दुसर्या टप्प्यातील कामांना दोन आठवड्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. दुसर्या टप्प्यातील कामे ही जल व विद्युत व्यवस्थापनाची असल्याचे वेळेत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
मंदिराच्या मूळ ढाच्यास धक्का न लावता ही सर्व कामे करण्यात येत आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे व जिर्णोद्धाराचे काम पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभार्याच्या संवर्धनाचे काम आषाढी यात्रा 2024 पूर्वी पूर्ण करण्यात आलेे आहे. मात्र , पहिल्या टप्प्यातील श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिराच्या गाभार्यातील कामे, विठ्ठल सभामंडप, बाजीराव पडसाळीची कामे पूर्ण झाली आहेत. ही वगळता इतर कामे सुरूच आहेत. मंदिरात दरवाजे, खांबावर लावण्यात आलेली चांदी काढण्यात आली आहे. पूर्वीची चांदी काढून ती वितळवून आवश्यकतेनुसार भर टाकण्यात येणार आहे. या चांदीचे कामही नव्याने करण्यात येणार आहे. या कामासाठी समिती नेमणूक करण्यात आली आहे. तसेच या सर्व कामाचे संपूर्ण व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येत आहे.
मंजूर आराखड्यानुसार प्रस्तावित कामे दोन टप्प्यात 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. पंढरपूर देवस्थान मंदिर विकास आराखडा अंतर्गत करण्यात येणार्या कामांसाठी आवश्यक परवानगी घेणे, कामांना तांत्रिक मान्यता घेणे, कामांकरता निधी वितरण करणे आणि आराखड्याशी संबंधित शासनास सादर करायची विवरणपत्रे याची जबाबदारी ही जिल्हाधिकारी यांच्यांवर सोपविण्यात आली आहे.