मुंबई, पुढारी वृत्तसेवा : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मलबार हिल विधानसभा क्षेत्रात असलेल्या वैद्यवाडी येथील १५० वर्षापेक्षा जुने असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर उघडण्याबाबत एका पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मंदिराच्या डागडुजीसाठी नियमांना अनुसरून आमदार निधीच्या माध्यमातून १० लाख रुपये देण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री लोढा यांनी पत्राद्वारे दिली आहे.
याचबरोबर भाविकांच्या मागणीप्रमाणे या मंदिराची चावी मंदिर व्यवस्थापन अथवा नागरिकांच्या स्वाधीन करावी, असे देखील सांगितले आहे. नागरिकांसाठी हे मंदिर सकाळी ६ ते ९ या वेळेत आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत खुले करण्यात येईल. बऱ्याच काळापासून मंदिर बंद असल्याने भाविकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे मंदिर उघडण्याच्या मागणीला अनुसरून पत्राद्वारे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलासादायक निर्णय घेतला आहे.
सदर मंदिर सांस्कृतिक दृष्टीने तसेच नागरिकांच्या आस्थेच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचे ठिकाण आहे. पुनर्विकासासाठी हे मंदिर तोडून तिथली साधारण १००० स्क्वेयर फूट पेक्षा जास्त मोक्याची जागा इमारतीसाठी वापरावी. मंदिर विस्थापित करून एका अडगळीत बांधावे हे येथील नागरिकांना मान्य नसल्याने विकासक आणि नागरिक यांच्यात संघर्ष आहे. विठ्ठल मंदिर न तोडता पुनर्विकास व्हावा, या मागणीसाठी येथील नागरिकांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यानुसार याठिकाणी निर्णय होईपर्यंत कोणतेही बांधकाम न करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
हेही वाचा :