जयंत पाटील : ‘अंतर्गत गटबाजीमुळेच पंढरपूर पोटनिवडणुकीत पराभव’

पंढरपूर : अंतर्गत गटबाजीमुळेच पंढरपूर पोटनिवडणुकीत पराभव : जयंत पाटील www.pudhari.com
पंढरपूर : अंतर्गत गटबाजीमुळेच पंढरपूर पोटनिवडणुकीत पराभव : जयंत पाटील www.pudhari.com
Published on
Updated on

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मात्र पोटनिवडणुकीत अंतर्गत गटबाजीमुळे जास्त मतदान होऊनही पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी बुथ कमिट्या नेमल्या नसल्याचा हा परिणाम आहे. पुन्हा नव्याने बुथ कमिट्या नेमा आणि नव्या जोमाने कामाला लागा अशा सुचना देत उपस्थित पदाधिकार्‍यांची हजेरी घेतली. बोटावर मोजण्याइतकेच पदाधिकारी उपस्थित असल्याने नाराजी व्यक्त करत माझ्याकडे हेलपाटे घालण्यापेक्षा मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडे, नागरिकांकडे हेलपाटे मारा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला (पश्‍चिम महाराष्ट्र) ला सोमवार दि. २१ पासून सांगोला येथून सुरुवात झाली. पंढरपूर येथील बैठकीत पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचा आढावा ना. जयंत पाटील यांनी घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष महिबुब शेख, सक्षणा सलगर, पक्ष निरीक्षक सुरेश घुले, प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, कल्याणराव काळे, भगीरथ भालके, नागेश फाटे, रमेश बारसकर, युवराज पाटील, गणेश पाटील, विजयसिंह देशमुख, दिपाली पांढरे, सुप्रिया गुंड, श्रेया भोसले, प्रणिताताई भालके, सुधीर भोसले, श्रीकांत शिंदे, अ‍ॅड. दिपक पवार आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. जयंत पाटील म्हणाले की, स्व. भारत भालके यांचे निधन झाले आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक लागली. यामध्ये स्व. भारत भालके यांची सहानुभुती आपल्या बाजूने होती. मतदार आपल्या बाजूने होते. दोन विरोधक एकत्रित येवूनही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला लाखापेक्षा जास्त मते मिळाली. असे असतानाही होणारा पराभव हा जिव्हारी लागणार आहे. असू द्या पराभव झाला. पराभव कोणाचा होत नाही. इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता. मात्र, या पराभवातून बाहेर येवून आपण जनतेसाठी काय काम केले. याचेही आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. फक्त विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचाच प्रश्‍न नाही.

तर याच्या पलिकडेही जनतेच्या काही अपेक्षा आहेत. त्याकडे लक्ष देणार आहात की नाही. असे म्हणत एकप्रकारे भगीरथ भालके, युवराज पाटील यांच्यात सुरु असलेल्या वादावर पडदा टाकण्याचे आवाहनच केले. जर हा मतदार संघ पुन्हा लढवायचा असेल तर बुथ कमिट्या सक्रीय करा. बुथ कमिट्यांमार्फत नागरिकांचे प्रश्‍न सोडवा. पक्षासाठी प्रमाणिकपणे काम करणार्‍याला पदावर बसवा. मुंबईला माझ्याकडे चकरा मारण्यापेक्षा आपल्या मतदार संघातील नागरिकांना वेळ द्या, नागरिकांमध्ये मिसळा, त्यांचे प्रश्‍न सोडवा. पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवा. मग बघा तुम्हाला गाडी दुरुस्त झालेली दिसेल, असे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. याप्रसंगी सर्वांसमोर तालुका अध्यक्ष , शहराध्यक्ष, युवक व युवती पदाधिकारी यांची व पदाधिकारी यांची हजेरी घेतली.

यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे पंढरपूर व मंगळवेढ्याकडे स्वतंत्रपणे लक्ष देणार असून डी. पी. डी. सी. तून दिलेल्या निधीनाचा सदुपयोग करण्याचे आवाहन केले आहे. तर भगीरथ भालके यांनी पोटनिवडणुकीत झालेला पराभव मान्य करत येथून पुढे पक्षवाढीसाठी व मतदार संघ पुन्हा जिंकण्यासाठी मतभेद बाजुला सारुन एकदिलाने काम करणार असल्याची ग्वाही दिली.

केंद्राचा विविध एजन्सीमार्फत वाढता हस्तक्षेप

महाविकास आघाडी सरकार राज्यात चांगले काम करत आहे. कोरोना काळात नागरिकांना चांगली सेवा दिली आहे, देत आहे. याची दखल केंद्र सरकारने घेतलेल्या यादीत पहिल्या स्थानी आहे. मात्र, केंद्र सरकार विविध एजन्सींजच्या माध्यमातून चौकश्या मागे लावत आहे. एकप्रकारे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. याअगोदर कधी अशी ढवळाढवळ झालेली नसल्याचे सांगत केंद्र सरकारच्या या धोरणावर ना. जयंत पाटील यांनी टिका केली.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news