Mohol Election Scam : धक्कादायक! मोहोळमध्ये दोन मतदान पेट्या सापडल्या धाब्यावर
पोखरापूर : मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटातील अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुरुल जिल्हा परिषद गटातील दोन मतदान मशीन व व्हीव्हीपॅड मशीन शनिवारी (दि.७) रात्री ११ च्या दरम्यान शहरानजीक पुणे रस्त्यावर असलेल्या एका धाब्याजवळ आढळून आले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी व एस. पी. घटनास्थळी येत नाही, तोपर्यंत मतदान पेट्या हलवू देणार नाही, अशी भूमिका घेतली. या सर्व प्रकारामुळे परिसरात प्रचंड मोठा गोंधळ उडाला असून परिसरातील नागरिकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर, नायब तहसीलदार अनिल शहापुरे, नायब तहसीलदार सुधाकर धाईजे यांच्यासह निवडणुकीची पूर्ण टीम घटनास्थळी दाखल झाली. यावेळी नरखेड व कुरुल जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. रात्री उशिरापर्यंत याबाबत निवडणूक प्रशासनाकडून कार्यवाही सुरू होती.
निवडणुकीचे निकाल काय लागणार हे स्पष्ट होतंय : उमेश पाटील
या पेट्या ज्या अवस्थेत सापडल्या आहेत, त्यावरून निवडणुकीचे निकाल काय लागणार हे स्पष्ट होत आहे. प्रशासनाचा हा कारभार अत्यंत संशयास्पद असून, हा प्रकार रिझर्व्ह बँकेच्या नोटा छापण्याचे मशीन पळवण्यासारखाच गंभीर आहे. ज्या पेट्या सुरक्षित ठेवाव्या लागतात, त्या रस्त्यावर सापडणे ही लोकशाहीची थट्टा आहे. यावरून महाराष्ट्राने समजून घेतले पाहिजे .या पेट्या माझ्या कुरुल जिल्हा परिषद गटाच्याच आहेत. घटनास्थळावरती जोपर्यंत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक येत नाही तोपर्यंत इथून पेट्या मी हलवू देणार नाही, अशी भूमिका उमेश पाटील यांनी घटनास्थळी घेतली होती.

