

Vilas Bhumre Election Rule Violation
पैठण: पैठण तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान नियमभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाचोड येथील मतदान केंद्रावर पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी मतदान केंद्रातील नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शनिवारी (दि.७) पैठण तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट आणि १८ पंचायत समिती गणांसाठी एकूण ३०६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू होती. याच दरम्यान दुपारी पाचोड येथील मतदान केंद्रावर आमदार विलास भुमरे हे कुटुंबासह मतदानासाठी गेले असता त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला मतदान केंद्रात नेले. यावेळी संबंधित निवडणूक कर्मचाऱ्यांकडून त्या मुलाच्या बोटाला शाई लावण्यात आली. तसेच मतदान करताना आमदारांनी मुलाला सोबत घेऊन ईव्हीएम मशीनवर मतदान केल्याने मतदान प्रक्रियेची गोपनीयता भंग झाल्याचा प्रकार घडला.
या घटनेची माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना मिळताच त्यांनी तात्काळ दखल घेत पैठणचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित मतदान केंद्रावरील दोषी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.