न्हाय ओ.. फेसबुकच्या सगळ्या बातम्या खऱ्या असतात का?; राजन पाटलांचा भाजप प्रवेशावर खुलासा

न्हाय ओ.. फेसबुकच्या सगळ्या बातम्या खऱ्या असतात का?; राजन पाटलांचा भाजप प्रवेशावर खुलासा

मोहोळ : पुढारी वृत्तसेवा : मोहोळचे माजी आमदार राजन पाटील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपशी घरोबा करणार म्हणून संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला उधाण आले होते. यासंदर्भात त्यांच्या कुटुंबाचे सदस्य वैभव बापू गुंड यांनी फेसबुक पोस्ट करून राजन पाटील हे आपल्या गटासह येत्या दोन तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती पोस्ट केल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान राजन पाटील यांनी मात्र, हे वृत्त खोटे असल्याचे सांगितल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये उभी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. माजी आमदार राजन पाटील हे तालुक्यातील राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते असून पक्षाच्या प्रदेश पातळीवर त्यांची कोणतीच गोष्ट ऐकून घेतली जात नसल्याचे सर्वश्रुत आहे. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील व राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांच्या गटाला कायमच झुकते माप देण्यात येत आहे. त्यामुळे या जोडीने पक्ष कार्यात आघाडी घेतल्यामुळे सहाजिकच राजन पाटील यांच्या गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळेच त्यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक पोस्ट करून यापूर्वीच पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या असून राजन पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन आल्याची देखील चर्चा आहे.

दरम्यान, मंगळवारी राजन पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांपैकी एक असणारे वैभव बापू गुंड यांनी फेसबुक पोस्ट करून राजन पाटील हे आपल्या गटासह येत्या दोन तारखेला भाजप प्रवेश करणार असल्याचे सांगून बाळराजे पाटील यांना भाजपकडून विधान परिषदेची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. माजी आमदार राजन पाटील हे या वृत्ताचा इन्कार करत असले, तरी त्यांच्याच कुटुंबातील सदस्याने केलेला हा गौप्यस्फोट खरा असल्याची चर्चा अनगरकर पाटील पिता-पुत्रांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीशी प्रामाणिक असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

यशवंत तात्या नॉट रिचेबल…

दरम्यान, राजन पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या बाबतीत आमदार यशवंत माने यांची भूमिका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केला. मात्र ते नॉट रिचेबल असून उत्तर प्रदेशला गेल्याचे समजत आहे. त्यामुळेच यशवंत तात्यांचा नॉट रिचेबलचा अर्थ काही केल्या लागेनासा झाला आहे.

न्हाय ओ न्हाय ओ, फेसबुकच्या सगळ्या बातम्या खऱ्या असतात का? वैभव गुंड यांनी फेसबुक पोस्ट केली असली, तरी त्यांना पण कुणीतरी चुकीची माहिती दिलेली असते. कशाचं काय आहो, आम्ही कुणाची चर्चा न्हाय, काय न्हाय, कुठल्या पक्षात जायचं कुठल्या न्हाय, पार हे सगळं सोशल मीडियावर स्वतःच्या विचाराने हे लोक पोस्ट टाकत असतात.
– राजन पाटील, माजी आमदार मोहोळ

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news