

गोपाळ लावंड
माळीनगर : देशभर गाजलेल्या नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्या तरुण-तरुणींवर केलेल्या लाठीमार करण्यात आला. या कृतीच्या निषेधासाठी माळीनगर (ता. माळशिरस) येथील आंबेडकर चळवळीतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गुरुवार दि २३ जुलै रोजी सकाळी साडे दहा निषेध मोर्चाचे आयोजन केले होते.
हा मोर्चा माळीनगर येथून निघून अकलूज येथील प्रांत कार्यालयावर धडकणार असून, यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात येणार आहे. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. माळीनगर परिसरातील आंबेडकरवादी, सामाजिक, युवक तसेच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, संविधानिक मार्गाने निषेध नोंदवून विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
मोर्चा अकलूज प्रांत कार्यालयावर पोहोचल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला निवेदन पाठविण्यात येणार आहे. यामध्ये नीट पेपरफुटीची सर्वोच्च स्तरावर निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात येणार आहेत. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, युवक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश शासनाला दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.