

दीपक शेळके
सोलापूर : जैव कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता सोलापूरकरांच्या जीवाशी खेळल्याने बायोक्लिन सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा महापालिकेने पाच वर्षांसाठी काळ्या यादीत समावेश केला. महापालिकेचे 40 लाखांचे नुकसान केल्याने ते वसुलीची नोटीस महापालिकेने बजावली. मात्र, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अशा वादग्रस्त कंपनीस दिलेली नोटीस रद्द करण्याची लेखी शिफारस महापालिका प्रशासनास केली.
सोलापूरकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपनीला ‘क्लिन चीट’ देण्याची शिफारस करणाऱ्या बेजबाबदार पालकमंत्र्याविरूद्ध सोलापूरकरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातील वैद्यकीय कचरा संकलन आणि त्यांवर प्रक्रिया करण्यासाठी नेमलेल्या बायोक्लिन सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कामात हलगर्जीपणा केला. यामुळे समस्त सोलापूरकरांचे आरोग्य धोक्यात आले. याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांनी कंपनीचा काळ्या यादीत समावेश केला.
हे प्रकरण गंभीर असतानाच संबंधित कंपनीला ‘क्लिन चीट’ देण्याचा खटाटोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुरू केला आहे. विशेष म्हणजे सोलापूरकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कंपनीस महापालिकेने दिलेली नोटीस रद्द करण्याची भयंकर शिफारस पालकमंत्री गोरेंनी केल्याने समस्त सोलापूरकरांत त्यांच्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. पालकंत्र्यांनी या प्रकरणात अकारणच हस्तक्षेप करत महापालिका प्रशासनाला लेखी सूचना केल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
बायोक्लिन सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याची कारवाई आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली. शहरातून संकलित केलेल्या जैविक कचऱ्यांची योग्य विल्हेवाट न लावल्याचा ठपका कंपनीवर ठेवत सोलापूरकरांच्या जीवाशी खेळल्याचा आरोप कंपनीवर होता. तसेच कंपनीच्या हलगर्जीपणामुळे महापालिकेस सुमारे 40 लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च आला. तो खर्च संबंधित कंपनीकडून वसूल करण्याबाबतही नोटीस महापालिका आयुक्तांनी कंपनीस दिली. आता तीच नोटीस रद्द करण्याचे लेखी आदेश देत पालकमंत्र्यांनी याविषयी पुढील दौऱ्यात चर्चा करावी, अशी सूचना महापालिका आयुक्तांना केली. यामुळे पालकमंत्र्यांना सोलापूरकरांच्या जीवाशी काही देणेघेणे नसल्याचे दिसून येत असल्याच्या प्रतिक्रिया शहरभर उमटत आहेत.
नियमभंग करणे, कामात हलगर्जीपणा, सोलापूरकरांच्या जीवाशी खेळणे अशी कृत्ये करणाऱ्या बायोक्लिन सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला वाचवण्यासाठी पालकमंत्री गोरे का प्रयत्न करत आहेत, यामागे काही ‘अर्थपूर्ण’ घडामोडी आहेत का, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
पालकमंत्री गोरेंना सोलापूरकरांचे सवाल
कामात हलगर्जीपणा, नियम न पाळणे अशी कृत्ये करणाऱ्या बायोक्लिन सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर केलेली कारवाई रद्द करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हा विषय इतका प्रतिष्ठेचा का केला आहे?
महापालिकेचे तब्बल 40 लाखांचे नुकसान करणाऱ्या, सोलापूरकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपनीस पालकमंत्री गोरे का पाठीशी घालत आहेत?
बायोक्लिन सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीस महापालिकेने दिलेली नोटीस रद्द करण्याची, याविषयी पुढील दौऱ्यात चर्चा करण्याची शिफारस पालकमंत्री नेमक्या कोणत्या आधारावर करत आहेत?
सोलापुरात कायद्याचे राज्य की पालकमंत्र्यांचा आदेश यापैकी योग्य ते काय?
प्रशासकीय हालचालींना वेग
पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर सदरचा विषय अत्यंत तातडीचा महवाचा असल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्तांनी आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र देऊन या प्रकरणाचा कार्यवाही अहवाल तात्काळ पालकमंत्री कार्यालय आणि अतिरिक्त आयुक्तांना सादर करण्याचे आदेश दिले आहेत.