

वेलंग : सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली वाईकरांची दिशाभूल केली. भाजपच्या उमेदवारांना बहुमत देऊन वाईकरांनी प्रस्थापितांना सत्तेबाहेर करीत भाजपच्या विकास कारभारावर शिक्कामोर्तब केले आहे. वाई नगरपालिकेचा निकाल हा सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराला वाईकरांनी दिलेली ही चपराक आहे. पालिका निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करणार आहे, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मोठ्या यशानंतर शहरातून विजयी उमेदवारांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात झालेल्या या मिरवणुकीनंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मदनदादा भोसले, तालुकाध्यक्ष दीपक ननावरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ. सुरभी भोसले, नव्याने निवडून आलेले नगराध्यक्ष अनिल सावंत, रोहिदास पिसाळ, संदीप कोरडे, सागर पवार, संदीप घोरपडे, ॲड.जगदीश पाटणे, जितेंद्र पिसाळ, नूतन नगरसेवक अपर्णा जमदाडे, प्रसाद बनकर, पदमा जाधव, ज्योती सचिन गांधी, जागृती मकरंद पोरे, विजय ढेकाणे, केतकी मोरे, संग्राम सपकाळ, दिपाली सावंत, नूतन मालुसरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, येणाऱ्या काळात वाई शहरातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणार आहे. वाईच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द आहे. वाई नगरपालिका ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात रूपांतरित करण्याचा दिलेला शब्द लवकरच पूर्ण करू. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला हद्दपार करण्याचा भाजपचा निर्धार आहे. जिल्ह्यात भाजपचे तीन मंत्री असल्याने वाईच्या पर्यटन विकासासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देवू. नगरपालिकेत भाजपची बहुमताची सत्ता येणे गरजेचे होते. तरीही उपनगराध्यक्ष हा भाजपचाच असेल असेही ना. गोरे म्हणाले.
अनिल सावंत म्हणाले, वाईकरांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. येणाऱ्या पाच वर्षांत वाई शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कसलीही तडजोड केली जाणार नाही.