

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात ज्येष्ठ नेते शरद पवार फक्त अकलूजपुरते मर्यादित उरले आहेत. कारण, त्यांच्या पक्षाला अकलूज या एकाच नगरपालिकेवर सत्ता मिळवता आली. एवढा मोठा नेता अकलूजसारख्या एका गावापुरताच मर्यादित राहिला अशी जळजळीत टीका ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली.
नगरपालिका निवडणूक निकालविषयक पालकमंत्री गोरे पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, सन 2017 साली भाजाचे दोन नगराध्यक्ष आणि 31 नगरसेवक भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. यंदा सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक आम्ही ताकदीने लढलो. यात मैंदर्गी, अक्कलकोट, बार्शी, अनगर अशा चार ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले. मोहोळमध्ये भाजपा चिन्हावर लढणे अवघड होते. तेथे भाजपाचे 11 नगरसेवक निवडून आले आहेत. पंढरपूर येथे 36 पैकी 27 नगरसेवक निवडून आले आहेत. मंगळवेढा येथे भाजपाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत. पंढरपूर, मंगळेवढा, मोहोळ येथे भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने भाजपाची सत्ता आली आहे. यंदा जिल्ह्यात भाजपाचे 131 नगरसेवक निवडून आले आहेत.
खा. प्रणितींनी आत्मपरीक्षण करावे
खा. प्रणिती शिंदे यांनी भाजपला नगरसेवक पदासाठी उमेदवार मिळत नसल्याचे सांगत काँग्रेसमधील कार्यकर्ते फोडत असल्याचा आरोप केला होता. त्यावर पालकमंत्री गोरे म्हणाले, काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते त्यांचा पक्ष का सोडत आहेत, याचे आत्मपरीक्षण खा. प्रणिती शिंदेसह त्यांच्या नेत्यांनी करावे.