

सातारा : गावागावांत चळवळ उभी राहिल्याशिवाय परिवर्तन होत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही ग्रामविकासाची चळवळ यशस्वी करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करुया. सातारा जिल्ह्याला चळवळीला मोठा इतिहास आहे, स्वराज्याची चळवळही याच मातीतून उभी राहिली. आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही चळवळ यशस्वी करण्यासाठी जिल्हावासियांनो सज्ज व्हा, शासन आपल्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, राज्य ग्रामीण विकास संस्थेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद उपस्थित होते.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान म्हणजे विकासाभिमुख नेतृत्व सिद्ध करणारी स्पर्धा आहे. विकासाची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, ग्रामविकासाला बळ देणार्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. या उद्देशाने सर्वांना बरोबर घेऊन ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ तयार करण्यात आले आहे. लोकसहभाग हा अभियानाचा मुख्य गाभा असून त्या माध्यमातून अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करावे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची येत्या 17 सप्टेंबर रोजी सुरुवात करण्यात येणार आहे. महिला बचत गट, तरुण मंडळे, नेहरु युवा मंडळे, माजी विद्यार्थी संघटना, माजी सैनिक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, गणेश मंडळे, वृक्षप्रेमी संघटना आदी सर्वांना या अभियानाच्या प्रारंभी निमंत्रित करुन त्यांना अभियानात सहभागी करून घ्यावे.
ना. शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्हा हा डोंगर दर्यांमध्ये वसलेला जिल्हा आहे. लोक कल्याणाच्या योजना ग्रामीण भागात सर्वदूर पोहचल्या पाहिजेत. सार्वजनिक हिताची कामे नेटाने व पद्धतशीर झाली पाहिजेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे जिल्ह्यात यशस्वीपणे राबवले जावे, यासाठी सर्व सरपंच, ग्रामसेवक व सदस्य, सामाजिक संस्था, संघटना व प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी झोकून देवून काम करावे.
संतोष पाटील म्हणाले, मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाची सुरूवात सातार्यातून होत आहे ही अभिनंदनीय गोष्ट आहे. ग्रामीण भागाचा विकास होत नाही तोपर्यंत जिल्ह्याचा व राज्याचा विकास होणार नाही. विविध संकल्पना जन्म देणारी व यशस्वी करणारी ही सातारची भूमी आहे.
याशनी नागराजन म्हणाल्या, सातारा जिल्हा कोणत्याही योजनांमध्ये मागे नाही. देश व राज्यपातळीवर सातारा जिल्ह्याने विविध योजनांच्या माध्यमातून कामाचा डंका वाजवला आहे. मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानामध्ये संपूर्ण राज्याचे लक्ष सातार्याकडे आहे. त्यामुळे गावच्या सरपंचांसह सर्वांवर अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी आहे.
आपलीच जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांकावर राहणार : याशनी नागराजन
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात सातारा जिल्ह्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा गौरव झालाच पाहिजे. मी या ग्रामविकास खात्याचा मंत्री असलो तरी गुणांकनामध्ये भेदभाव केला जाणार नसल्याचे ना. जयकुमार गोरे यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व त्यांचे पती कार्तीकेयन एस हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मात्र या अभियानात दोन्ही जिल्हा परिषदेमध्ये स्पर्धा निर्माण होणार असे वक्तव्य ना. गोरे यांनी करताच याशनी नागराजन यांनी उभे राहून सातारा जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांकावर राहिल, अशी ग्वाही देताच सभागृहात टाळ्या वाजल्या.