सोलापूर, पुढारी वृत्तसेवा: सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, अक्कलकोट नगरपरिषद, दक्षिण सोलापूर, मोहोळ, महानगर पालिका व उत्तर सोलापूर या तालुक्यातील एकूण ८६२ शाळांची तपासणी पूर्ण केल्या आहेत. शाळेची इमारत, बांधकाम, वर्ग खोल्यांची स्थिती, विजेची सोय, स्वच्छतागृह, पाण्याची सुविधा, कंपाउंड, बेंचेसची सुविधा, अशा अनेक समस्यांबाबत समितीच्या वतीने पाहणी करण्यात आली. मोहोळ तालुक्यातील पापरी शाळेत समितीच्या भेटीचा समारोप करण्यात आला. School Inspection
औरंगाबाद खंडपीठातर्गंत मुंबई उच्च न्यायालयात सुओ मोटो जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार ही शाळा पाहणी करण्यात आली. School Inspection
समितीचे सचिव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तृप्ती अंधारे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचे पहिले काम आई करते. त्यानंतर शाळा करत असते, म्हणून शाळेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सोलापूर हा पहिला जिल्हा असेल जिथे खंडपीठाच्या नियमाचे काटेकोर पालन करून सर्वाधिक शाळेत कमी कालावधीत तपासणी करण्यात आली आहे. जिल्हा न्यायाधिश सलमान आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली हे काम अतिशय काटेकोरपणे पूर्ण केले आहे. गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्नशील असण्याचा शब्द त्यांनी दिला आहे.
जिल्हा सत्र न्यायाधीश रेखा पांढरे म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या समस्या मला या याचिकेमुळे जाणण्याचा योग आला. या समितीच्या माध्यमातून शाळांच्या समस्यांबाबतचा अहवाल आम्ही हायकोर्टाला सादर करू. शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी शाळेतील समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या शाळा तपासणी पूर्ण होण्यासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या समन्वयक सुप्रिया मोहिते न्यायालयीन व्यवस्थापक, शिक्षण अधिकारी (माध्य) तृप्ती अंधारे, सहा. पोलिस आयुक्त गुन्हे शाखा श्रीमती पी. एन. सोनवणे, होम डीवायएसपी विजयालक्ष्मी कुरी व अमोल भारती डीवायएसपी, तालुक्याचे प्रांताधिकारी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षणाधिकारी (माध्य) यांचे प्रतिनिधी, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, मल्लिनाथ स्वामी, विस्तार अधिकारी बापूराव जमादार, दयानंद कवडे व गुरुबाळ सणके यांनी विशेष परिश्रम घेतले.
हेही वाचा