

Farmers in Mungshi suffer heavy losses due to unseasonal rains
वैराण : पुढारी वृत्तसेवा
बार्शी तालुक्यातील मुंगशी व परिसरातील दहिटणे, सासुरे, राळेरास, तडवळे, यावली, इर्लेवाडी आदी गावात तुफान वादळासह जोराचा अवकाळी पाऊस झाल.
या अवकाळी पावसामुळे अनेकांचे घरावरील पत्रे उडून गेले. तसेच मुंगशी येथील शेतकरी अर्जून श्रीपती क्षीरसागर यांनी दोन दिवसांपूर्वी जालींदर राऊत यांच्या बेदाणा शेडवर आपला द्राक्षांचा माल टाकला होता. या अचानक आलेल्या वादळाने शेडवरील शेडनेट कागद उडून गेला व झालेल्या अती पावसाने अंदाजे ७ ते ८ टन बेदाण्याचा चिखल झाला. त्यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे.
या मुळे वर्षभर पोटच्या लेकरांप्रमाणे संभाळलेली द्राक्ष बाग तसेच ती संभाळण्यासाठी महागडी औषधे, खते, मजुरी यावर झालेला अमाप खर्च करून हातातोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटानी एका क्षणात नाहीसा झाला. यामुळे झालेल्या कर्जाचा डोंगर फेडायचा कसा व पुढील संकटांचा सामाना करायचा कसा हा मोठा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
त्यामुळे फक्त बेदाण्याचा नव्हे तर शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा देखील चिखल झाल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांचे पीक अजून झाडावर आहे. तरी काहींनी आपला माल शेडवर टाकला आहे. यामुळे झालेल्या या अस्मानी संकटाच्या नुकसानीतून बळीराजा सावरणार कसा हा मोठा प्रश्न आहे. तरी शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे व बेदाणा शेडचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी आता शेतकरी करत आहेत.