Solapur unseasonal rain: अवकाळी; गारपिटीने द्राक्ष, आंबासह धान्याचे नुकसान

पांगरी परिसरात झाडे उन्मळून पडली, घरावरील पत्रे उडाले; उत्तर सोलापुरामध्ये गहू, हरभरा पिकांना फटका
Solapur unseasonal rain
Solapur unseasonal rainPudhari
Published on
Updated on

बार्शी : तालुक्यात गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी 3.45 वाजता विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तब्बल सव्वा तास अवकाळी गारांचा पाऊस झाला. अवकाळी पाऊस झाल्यामुळे तालुक्यात सुगी चालू असलेल्या ज्वारी, गहू, हरभरा, या पिकाबरोबरच द्राक्षे व वेलवर्गीय पिकांची मोठी आर्थिक हानी झाली.

गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजता पांगरी, मळेगाव, चिखर्डे, गोरमाळे, हिंगणी, कारी आदी परिसरात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात, रस्त्यावर मोठ मोठे वृक्ष मुळासकट उन्मळून पडले होते. अनेक शेतकऱ्यांनी काढून टाकलेले ज्वारीची पेंड्या वादळी वाऱ्याबरोबर उडून गेल्या. आणेक भागात विज वाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. दुपारी अचानक वादळी वारे, विजांचा कडकडाट व गारपीट झाल्यामुळे शेतामधील काढून टाकलेल्या ज्वारी, गहू व इतर पिकाचे नुकसान झाल्याचे मळेगावातील शेतकरी संतोष निंबाळकर यांनी सांगितले.

वैराग परिसरात गारांचा पाऊस

वैराग : वैराग व परिसरातील घाणेगाव, मानेगाव, काळेगाव, पिंपरी, साकत, दहिटणे, मुंगशी, सासुरे, तडवळे, यावली, इर्ले आदी गावात गारांचा पाऊस झाला.यामूळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

द्राक्ष व अंबा बागांसह ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. द्राक्ष बागांसह झालेल्या पिंकाचे त्वरित पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी सेनापती क्षीरसागर यांच्यासह इतर शेतकऱ्यांमधून होत आहे. अवकाळी पावसामुळे तसेच गारांमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी प्रताप क्षीरसागर यांनी सांगितले.

मोहोळमध्ये अर्धा तास पावसाची हजेरी

पोखरापूर : मोहोळ शहर व तालुक्यातील अनेक गावात गुरुवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अर्धा तास हजेरी लावली. या पावसाने द्राक्ष, आंब्याच्या बागांबरोबरच काढणीला आलेला गहू,ज्वारी आदी पिकांना मोठा फटका बसणार आहे. या पावसामुळे गहू, द्राक्ष बागा, आंबा या पिकांचेही नुकसान होणार आहे. वादळी वाऱ्यामुळे व विजांच्या कडकडाटामुळे वीज गायब झाली होती.

उत्तरमध्ये गहू, हरभरा पिकांना फटका

उत्तर सोलापूर : द्राक्ष बागेचा माल बेदाणा रॅकवर टाकला आणि संध्याकाळी अवकाळी पावसाला सुरुवात झाली. रॅकवरील द्राक्षाचा माल भिजू नये, यासाठी त्यावरील कागद ओढताना शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अवकाळी पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील द्राक्ष, ज्वारी, गहू, आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पडसाळी, वांगी, कळमण, रानमसले, वांगी, वडाळा या गावांमध्ये अवकाळला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपला द्राक्षाचा माल बेदाणा करण्यासाठी बेदाणा रॅकवर टाकला आहे.

तो माल काळा पडू नये, पावसात भिजू नये यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची गुरुवारी संध्याकाळी तारांबळ उडाल्याचे चित्र तालुक्यात ठिकठिकाणी पाहायला मिळाले. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ज्वारी, गहू, हरभरा ही पिके काढून शेतामध्ये टाकली आहेत. त्या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. कडबा पावसात भिजल्याने पूर्णपणे वाया जाणार आहे. काळा पडलेल्या कडव्याला कवडीमोल दर मिळणार आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक फटका दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news