

पिंपळनेर : 3 एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने बीड तालुक्यातील सुमारे 10 ते 12 गावांना जोरदार तडाखा दिला असून, शेतीपिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
तालुक्यातील घाटजवळा, वलीपूर, आंबेसावळी, मन्यारवाडी, मानकुरवाडी, काळेगाव, मैंदा, पोखरी, घाटसावळी, ताडसोन्ना, परभणी केसापुरी, बकरवाडी व बेलवाडी या गावामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः कांदा, गहू, ज्वारी, मका, हरभरा तसेच फळबागा यांना मोठा फटका बसला आहे.
वादळी वाऱ्याच्या जोरदार झोतामुळे घाटजवळा व वलीपुर परिसरातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची शेड कोसळली असून, त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच ताडसोन्ना, वलीपूरसह अनेक गावांमध्ये गायगोठे, दुकाने आणि पत्र्याची घरे यांचेही नुकसान झाले आहे.या अचानक आलेल्या अवकाळी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी पुढे आली आहे.
प्रशासनाने त्वरित पाहणी करून नुकसानग्रस्तांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. अवकाळी पावसाच्या या तडाख्यामुळे ग्रामीण भागात हाहाकार माजला असून, शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक एका क्षणात उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या समोर मोठे संकट उभे ठाकले आहे.