

सोलापूर : राज्यातील पशुपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन आणि वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पशुपालकांना त्यांच्या पशुधनाच्या देखभालीसाठी व दैनंदिन खर्चासाठी (खेळते भांडवल) आकर्षक व्याज सवलतीसह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, त्यांना 1.60 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण उपलब्ध करून दिले जाईल. दूध संस्थेने हमी दिल्यास ही मर्यादा तीन लाख रुपयांपर्यंत वाढवता येते. तसेच, ज्यांच्याकडे आधीच किसान क्रेडीट कार्ड आहे, त्यांनाही तीन लाखांपर्यंतची पतमर्यादा वाढवून घेता येईल.
कर्जाचा मूळ व्याजदर 9 टक्के असला तरी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून 3 टक्के आणि राज्य शासनाच्या 11 फेब्रुवारी 2026 च्या निर्णयानुसार 4 टक्के अशी एकूण 7 टक्केपर्यंत व्याज सवलत मिळू शकते. बँकांनाही यात 2 टक्के व्याज सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या पशुपालक, शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत शून्य टक्के व्याजदराचाही लाभ घेता येऊ शकतो.
सन 2026-27 पासून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना (राज्य व जिल्हास्तर) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना या क्रेडिट कार्डद्वारे खेळते भांडवलाचा लाभ घेता येईल. अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयात अथवा 1962 या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधाव, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्त डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.