

Kasegaon buffalo fashion show
संतोष पवार
कासेगाव : हलगीचा आवाज, ढोल–ताशांचा नाद आणि नटलेल्या म्हशींचा थाट, असं देखणं दृश्य आज कासेगावात अनुभवायला मिळालं. निमित्त होतं दिवाळी पाडव्याचं. रंगीबेरंगी मोरपीस, चांदी–सोनेरी तोडे, कवड्यांच्या माळा आणि घुंगरांच्या चाळांनी सजलेल्या या डौलदार म्हशींनी संपूर्ण गावात उत्साहाची उधळण केली. जणू काही कासेगावच्या रस्त्यांवर म्हशींचा फॅशन शोच रंगला होता.
वर्षानुवर्षे चालत आलेली ही अनोखी परंपरा म्हणजेच ‘म्हशी पळविणे उत्सव’ — याचा अनुभव घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. म्हशींचे मालक आपल्या लाडक्या जनावरांना सजवून अभिमानाने मिरवत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि जनावरांवरील माया स्पष्ट जाणवत होती.
म्हशींच्या केशरचनेपासून ते सजावटीपर्यंत नावीन्य आणण्याची स्पर्धाच रंगली होती. काही म्हशींना रंगीत रिबीन, काहींना मोरपीस आणि काहींच्या अंगावर सुंदर नक्षीकाम! दुचाकींच्या सायलेन्सर पुंगळ्या काढून ‘टर्रर्रर्रर्र’ असा आवाज करत म्हशींना पळवतानाचा थरारक अनुभव प्रेक्षकांनी घेतला. मालक आणि म्हैस यांच्यातील सुसंवाद आणि विश्वासाने संपूर्ण वातावरण भारावले होते.
म्हैस मालक सांगतात, “हा उत्सव म्हणजे आपल्या म्हशींचा सन्मान करण्याचा दिवस. वर्षभर घरासाठी, दुधासाठी मेहनत घेणाऱ्या या जनावरांच्या सेवेला सलाम करण्याचा हा क्षण आहे.” दिवाळीपूर्वी म्हशींना विशेष प्रशिक्षण, पौष्टिक खुराक आणि धावण्याचा सराव दिला जातो.
कासेगाव- उळे मुख्य रस्त्यावर, बसस्टॉपजवळील मारुती मंदिर ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या मार्गावर म्हशी पळविणे उत्सव आणि सजावटीचा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. गुलाल, रिबीन, मोरपीस आणि चकाकत्या माळांनी सजलेल्या म्हशी या रंगोत्सवाचा केंद्रबिंदू ठरल्या.
‘उडान’, ‘राधा’, ‘पायल’, ‘बावरी’, ‘बांगडी’, ‘नकटी’, ‘पोपट’, ‘अंबर’ आणि ‘बाबू’ अशी लाडकी नावे असलेल्या या गवळाऊ पंढरपुरी म्हशी आपल्या मालकाशेजारी तोऱ्यात उभ्या होत्या. शिट्टीचा व दुचाकींचा आवाज ऐकताच त्या अभिमानाने पळू लागल्या, जणू काही आपल्या सजावटीचे दर्शनच घडवत होत्या.
दिवाळी पाडव्याच्या या पारंपरिक म्हशी उत्सवाने कासेगावची ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि गवळी समाजाचे पशुप्रेम पुन्हा एकदा उजळून निघाले. हा सोहळा पाहण्यासाठी सोलापूर, तुळजापूर, बोरामणी, उळे, वरळेगाव, गंगेवाडी, वडजी, हगलूर, तळे, हिप्परगा, धोत्री, खडकी आदी गावांमधून नागरिकांनी उत्साहात गर्दी केली होती.