

मोडनिंब : अचानक समोर आलेल्या दुचाकीला बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार उपचारादरम्यान मृत झाला, तर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली. बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. हा अपघात सोलापूर-पुणे महामार्गावर मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडला.
शंकर धावजी लडके (वय 24) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. पुष्पा धावजी लडके (22) दोघेही रा. विटाळा, ता. डिग्रज, जि. यवतमाळ असे जखमीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर आकुंभे गावात जाण्यासाठी शंकर लडके याने वेगाने दुचाकी महामार्गावर घेतली. याचवेळी अक्कलकोटवरून पुणेकडे जाणाऱ्या एसटी बसने दुचाकीला बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार शंकर लडके डोक्याला आणि उजव्या पायाला जबर मार लागल्यामुळे गंभीर जखमी झाला.
सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेली पुष्पा लडके ही डोक्याला आणि हाताला जबर मार लागल्यामुळे गंभीर जखमी झाली. तिला वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ. महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक मगंद भोसले यांनी टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाजा येथील ग्रस्तीपथक, रुग्णवाहिका पथक आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी बालाजी साळुंखे आणि त्यांचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.