

Attractive floral decorations at Shri Vitthal-Rukmini temple on the occasion of Lakshmi Puja
पंढरपूर : सुरेश गायकवाड
दीपावलीच्या पवित्र पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या वतीने मंदिरात व मंदिरावर लक्ष्मीपूजनानिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीत वैभव, भक्ती आणि सौंदर्य यांचा सुंदर संगम साधण्यात आला आहे. या फुलांचा सुगंध दरवळत असल्याने आणि ही सजावट पाहून दर्शनासाठी आलेले भाविक मनोमनी धन्यता मानत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सदर सजावट श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त अर्जुन हनुमान पिंगळे (रा. बीड) यांच्या मार्फत करण्यात आली आहे. सजावटीसाठी सुमारे १५०० ते २००० किलो इतक्या प्रमाणात विविध प्रकारची ताजी फुले वापरण्यात आली आहेत.
या सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या फुलांमध्ये
कोंडा, शेवंती, अष्टर, गुलाब, ऑर्किड, अँथोनीयम, जिप्स, सायकस, गुलछडी, इत्यादी फुलांचा समावेश असून या सर्व फुलांद्वारे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा परिसर रंग, सुगंध आणि भक्तीभावाने उजळून निघाला आहे.
मंदिरातील श्री.विठ्ठल चौखांबी, सोळ खांबी परिसर, रुक्मिणी मातेचे मंदिर, तसेच प्रवेशद्वार, या सर्व भागात कलात्मक डेकोरेशन करण्यात आले आहे. पारंपारिक आणि आधुनिक फुलांच्या रचना यांचा सुंदर संगम भाविकांना एक अद्भुत दृश्यानुभूती देत आहे.
या सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक फुलांचा अत्यंत कुशलतेने केलेला वापर, रंगसंगतीतील समतोल, तसेच विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिराच्या आध्यात्मिकतेला साजेसा सुगंधित वातावरणनिर्मिती झाली आहे.अशी माहिती प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली आहे.
जलद व सुलभ दर्शन....
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने भाविकांसाठी दीपावली आणि लक्ष्मीपूजनाला होणारी गर्दी लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना सुलभ व जलद दर्शन देण्यात येणार आहे . भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.